
मुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशनच्या (जीएमबीए) संयुक्त विद्यमाने सीसीआय-जीएमबीए योनेक्स सनराइज जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा २ जूनपासून सीसीआय बॅडमिंटन कोर्टवर आयोजित केली जाणार आहे.
सहा दिवस चालणारी ही स्पर्धा पुरुष एकेरी आणि दुहेरी, महिला एकेरी आणि दुहेरी, मिश्र दुहेरी, ज्युनियर मुले आणि १९ वर्षांखालील मुली एकेरी आणि दुहेरी, ज्युनियर मुले आणि १७ वर्षांखालील मुली एकेरी आणि दुहेरी, सब-ज्युनियर मुले आणि १५ वर्षांखालील मुली एकेरी, सब-ज्युनियर मुले आणि मुलींचे १३ वर्षांखालील एकेरी, मिनी मुले आणि ११ वर्षांखालील एकेरी मुली या गटांमध्ये होईल. या शिवाय पुरुष वरिष्ठ (दुहेरी) ८० प्लस कॉम्बिनेशन (संयोजन) वय, महिला वरिष्ठ (दुहेरी) ७५ प्लस कॉम्बिनेशन वय आणि मिश्र वरिष्ठ (दुहेरी) ८० प्लस कॉम्बिनेशन वय अशा तीन वरिष्ठ (सीनियर) गटांमध्ये स्पर्धा खेळविण्यास आयोजक उत्सुक आहेत.
बीडब्ल्यूआय आणि बीएआयच्या अटी आणि नियमांनुसार स्पर्धा आयोजित केली जाईल. एक खेळाडू जास्तीत जास्त तीन स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो. उप- उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचे (प्री-क्वार्टर फायनल) सर्व सामने प्रत्येकी १५ गुणांच्या सर्वोत्तम तीन सामन्यांमध्ये (बेस्ट ऑफ थ्री) खेळले जातील. क्वार्टर फायनलपासूनचे सर्व सामने प्रत्येकी २१ गुणांच्या सर्वोत्तम तीन सामन्यांमध्ये खेळले जातील.