
सतीश भालेराव
नागपूर ः विदर्भातील युवा व अनुभवी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयपीएलच्या धर्तीवर यावर्षीपासून विदर्भ प्रो टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र स्पर्धेच्या काळात शहरात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजण पडण्याची दाट शक्यता आहे.
व्हीसीएची ही स्पर्धा येत्या ५ ते १५ जूनदरम्यान जामठा स्टेडियमवर रंगणार आहे. जवळपास दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू जितेश शर्मा, अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, शुभम दुबे, अपूर्व वानखेडे या आयपीएल स्टार्ससह रणजी व अन्य संघांचे प्रतिनिधित्व करणारे विदर्भातील अक्षय वाडकर, ध्रुव शोरे, सिद्धेश वाठ, अक्षय कर्णेवार, यश राठोड, आदित्य ठाकरे, दानिश मालेवार, नचिकेत भुते, ललित यादव, मंदार महाले, अमन मोखाडेसारखे अनेक युवा व अनुभवी क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय खेळाडू मोना मेश्राम, दिशा कासट, भारती फुलमाळी या अनुभवी महिला खेळाडूही सहभागी होत आहेत. यापैकी अनेकांसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्तम व ऐतिहासिक संधी आहे. त्यामुळे सारेच जण या स्पर्धेबद्दल उत्सुक असून, स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
यंदा विदर्भाला यलो अलर्ट मौसम विभागाने दिला असून ऐन पावसाळ्यात होत असलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने दुपारी व प्रकाशझोतात खेळले जाणार आहेत. त्यामुळे पाऊस हमखास गोंधळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामतः खेळाडूंसह व्हीसीएच्याही आनंदावर विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामठा स्टेडियमची “ड्रेनेज सिस्टिम” जागतिक दर्जाची आहे. छोटी मोठी सर आली तरीही सामना सुरळीत पार पडू शकतो. मात्र मुसळधार किंवा एकदम पाऊस लागून पडल्यास स्पर्धेचा पचका निश्चित होऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे, नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) बुधवारीच गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झाले आहेत. लवकरच नागपुरातही आगमन अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.