
गणेश माळवे
………………..
पहिली खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा दीव येथे अतिशय उत्कृष्टरित्या आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात परभणीकराचा मोलाचा वाटा आहे. अक्षय विद्याधर कोटलवार हे मुळचे परभणीचे असून त्यांनी या स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून प्रभावी काम केले आहे.

परभणीचे रहिवासी असलेले अक्षय कोटलवार यांनी टेबल टेनिस खेळाडू म्हणून नावलौकिक प्राप्त केला. परभणी जिल्ह्याचे त्यांनी टेबल टेनिस या खेळात प्रतिनिधित्व केले आहे. राज्य टेबल टेनिस क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोठा नावलौकिक केल्याचा अभिमान वाटतो.
दादरा आणि नगर हवेली तसेच दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातील खेळांच्या विकासाचा एक महत्त्वाचा शिल्पकार म्हणून अक्षय कोटलवार यांचे नाव अग्रभागी आहे. माजी टेबल टेनिस खेळाडू असलेले अक्षय कोटलवार हे सध्या सहायक शारीरिक शिक्षण आणि खेळ अधिकारी म्हणून दीव-दमण येथे कार्यरत असून प्रदेशातील खेळाडूंच्या कौशल्यवाढीसाठी आपला अनुभव व उत्साह यांचा वापर करत आहेत.

नोडल अधिकारी आणि खेळ तांत्रिक संचालन समितीचे मुख्य सदस्य म्हणून अक्षय कोटलवार यांनी खेलो इंडिया बिच गेम्स स्पर्धेचे दीव येथे यशस्वीपणे आयोजन केले. ही स्पर्धा १९ ते २४ मे या कालावधीत घोघला बीच येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २ हजाराहून अधिक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि तांत्रिक अधिकारी सहभागी झाले होते. बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच फुटबॉल, बिच सेपक टकारा, ओपन वॉटर स्विमिंग, पिंच्याक सिलॅट, मल्लखांब आणि टग ऑफ वॉर अशा आठ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा झाली. अक्षय कोटलवार यांनी तांत्रिक बाबींचे योग्य नियोजन, विविध भागधारकांशी समन्वय आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन सुनिश्चित केले आणि त्यामुळे या स्पर्धेचा स्तर उंचावला.

अक्षय कोटलवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासित प्रदेशाने राष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट्स स्पर्धेत कधीही न मिळालेला सर्वोच्च क्रमांक मिळविला आहे. त्यात ४ सुवर्ण आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक टप्पा दीव दमण या प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जो या प्रदेशातील खेळाडूंच्या क्षमतेची आणि खेळ विकास कार्यक्रमांच्या यशाची साक्ष देतो.
यापूर्वी, पहिले मल्टी-स्पोर्ट बीच गेम्स २०२४ हे देखील घोघला बीचवर ४ ते ११ जानेवारी दरम्यान यशस्वीपणे पार पडले होते. त्यात १८०० हून अधिक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले होते आणि आठ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा झाली होती. या स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात कौतुक केले होते आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय ओळख मिळाली.
तसेच, अक्षय कोटलवार यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सिल्वासामध्ये स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंडर १७ टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे केले होते. ही केंद्रशासित प्रदेशात पहिली राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होती. या स्पर्धेत देशभरातून शेकडो तरुण खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे प्रदेशाच्या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्याच्या क्षमतेचा अभिमान वाटतो.
या प्रमुख कार्यक्रमांव्यतिरिक्त, कोटलवार खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, गटस्तरीय सहभाग वाढविण्यासाठी व खेळाडूंच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांचे दीर्घकालीन ध्येय सशक्त आणि सर्वसमावेशक खेळ संस्कृती विकसित करण्याचे आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रतिभा प्रोत्साहित होईल आणि प्रदेशाचा खेळ क्षेत्रातील मान उंचावेल.
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पासून ते एक यशस्वी क्रीडा प्रशासक म्हणून अक्षय कोटलवार यांची ही वाटचाल हे दाखवते की, समर्पण, नेतृत्व व दूरदृष्टीमुळे खेळांच्या क्षेत्रात प्रगती करता येते. त्यांचा प्रयत्न दादरा, नगर, हवेली, दीव दमण या प्रदेशाला भारताच्या क्रीडा नकाशावर स्थान देते आणि देशाच्या जागतिक स्तरावरील खेळ धोरणाशी संरेखित होतो. अक्षय कोटलवार यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पहिली खेलो इंडिया बीच स्पर्धा संस्मरणीय बनली आहे यात शंकाच नाही.