व्हीपीटीएलचे वेळापत्रक जाहीर; शुभंकर, संघाच्या जर्सीचे अनावरण

  • By admin
  • June 1, 2025
  • 0
  • 53 Views
Spread the love

जामठा क्रिकेट स्टेडियमवर ५ जूनपासून स्पर्धा रंगणार

नागपूर ः पहिल्या विदर्भ प्रो टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते १५ जून या कालावधीत रंगणार आहे. तसेच स्पर्धेचे शुभंकर व जर्सीचे अनावरण एका शानदार सोहळ्यात करण्यात आले.

हॉटेल रॅडिसन ब्लू येथे झालेल्या एका शानदार समारंभात व्हीपीटीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने लीग अँथम, शुभंकर (वाघोबा) तसेच संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. व्हीसीएचे अध्यक्ष, न्यायमूर्ती विनय एम देशपांडे (निवृत्त) यांनी स्वागत भाषण केले आणि शुभंकरचे अनावरण केले. व्हीसीएचे माजी अध्यक्ष अद्वैत मनोहर यांनी कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी भारताचा वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांचा सत्कार केला.

विदर्भ प्रीमियर टी २० लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी व्हीपीटीएलचे राजदूत उमेश यादव आणि झुलन गोस्वामी यांचा सत्कार केला. त्यावेळी प्रेक्षकांकडून जोरदार जल्लोषाचा प्रतिसाद मिळाला. सहा फ्रँचायझी मालकांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर ५ जून रोजी होणाऱ्या व्हीपीटीएलच्या उद्घाटन सामन्यात कोणते दोन संघ खेळतील हे ठरवण्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. बॉलिवूड संगीताचा बादशहा सोनू निगम यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल.

व्हीपीटीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पुरुष आणि महिला लीगचा अंतिम सामना १५ जून (रविवार) रोजी होणार आहे. पहिल्या दिवसाच्या सामन्याची तिकिटे झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. इतर दिवशी प्रेक्षकांसाठी प्रवेश मोफत असेल.

या प्रसंगी संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. सर्व सामने नागपूरच्या जामठा येथील जागतिक दर्जाच्या व्हीसीए स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. व्हीपीटीएलमध्ये पुरुषांसाठी सहा फ्रँचायझी संघ आणि महिलांसाठी तीन संघ आहेत.

विदर्भ प्रो टी२० लीगचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर केले जाईल आणि जिओ-हॉटस्टार, वेव्हज आणि फॅन कोड या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल. माजी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टार समालोचन संघाचा भाग असतील. कार्यक्रमाची सांगता करताना व्हीसीए सचिव संजय बडकस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *