
मुंबई इंडियन्स संघावर पाच विकेटने विजय; कर्णधार श्रेयस अय्यरची नाबाद नाबाद ८७ धावांची खेळी निर्णायक
अहमदाबाद : कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ८७) आणि नेहर वधेरा (४८) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा (पाच बाद २०७) पाच विकेट राखून पराभव केला. या विजयासह पंजाब संघ आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच दाखल झाला आहे. तीन जून रोजी आरसीबी आणि पंजाब यांच्यात विजेतेपदाचा सामना होणार आहे.
२०१४ पासून अहमदाबाद येथे मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवता आलेला नाही. पराभवाची ही मालिका मुंबईला खंडीत करण्यात यश आले नाही. क्वालिफायर २ हा महत्त्वाचा सामना मुंबईने गमावला.

पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आक्रमक फलंदाज प्रभसिमरन सिंग अवघ्या ६ धावांवर बाद झाला. बोल्ट याने त्याचा बळी घेऊन पंजाबला पहिला धक्का दिला. प्रियांश आर्य व जोश इंगलिस या जोडीने डाव सावरत ४२ धावा जोडल्या. प्रियांश आर्य दोन चौकार व एक षटकार ठोकून २० धावांवर बाद झाला. अश्विनी कुमरा याने त्याची विकेट घेतली. हार्दिंक पंड्या याने जोश इंगलिस याला ३८ धावांवर बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. त्याने पाच चौकार व दोन षटकार मारले.
पंजाबने ७२ धावांवर तीन आक्रमक फलंदाज गमावले होते. त्यानंतर कर्णधार श्रैयस अय्यर आणि नेहल वधेरा या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करुन सामन्यातील रोमांच कायम ठेवला. अश्वनी कुमार याने नेहल वधेरा याला ४८ धावांवर बाद करुन मोठा अडथळा दूर केला. त्याने २९ चेंडूत चार चौकार व दोन षटकार ठोकून ४८ धावा फटकावल्या. शशांक सिंग (२) धावबाद झाला. हार्दिक पंड्याने सुरेख फेक करुन त्याला धावबाद केले. कर्णधार श्रेयस अय्यर याने ४१ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. अय्यर याने पाच चौकार व आठ टोलेजंग षटकार ठोकून रोमांचक विजय मिळवून दिला. १९ षटकात पाच बाद २०७ धावा फटकावत पंजाबने पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. अश्वनी कुमारने ५५ धावांत दोन गडी बाद केले. बोल्ट (१-३८) व हार्दिक (१-१९) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
बेअरस्टो, सूर्या, तिलक वर्माची बहारदार फलंदाजी
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील क्वालिफायर २ सामना पावसामुळे तब्बल २.१५ तास उशीराने सुरू झाला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टोइनिस याने रोहित शर्माला अवघ्या ८ धावांवर बाद करुन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर बेअरस्टो व तिलक वर्मा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. बेअरस्टो याने २४ चेंडूत ३८ धावांची जलद खेळी साकारली. बेअरस्टो धोकादायक बनत असताना विशक याने त्याची विकेट घेतली. बेअरस्टो याने तीन चौकार व दोन षटकार मारले. बेअरस्टो चुकीचा फटका मारून बाद झाला. तिलक वर्मा २९ चेंडूत ४४ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने दोन चौकार व दोन षटकार मारले.

चार बाद १४२ या धावसंख्येवर सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्या यांच्यावर मोठी भिस्त होती. सूर्यकुमार यादव याने २६ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने चार चौकार व तीन उत्तुंग षटकार मारला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. हार्दिक पंड्या अवघ्या १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर नमन धीर याने १८ चेंडूत ३७ धावा फटकावत डावाला आकार दिला. त्याने सात चौकार मारले. राज बावा ८ धावावर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्स संघाने षटकामागे प्रत्येकी १० धावा काढल्या. मुंबईने २० षटकात सहा बाद २०३ धावसंख्या उभारली.
पंजाब संघाकडून अझमतुल्लाह (२-४३) याने दोन विकेट घेतल्या. जेमीसन (१-३०), स्टोइनिस (१-१४), विजयकुमार विशक (१-३०), चहल (१-३९) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.