
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक बुद्धिबळ स्पर्धेत १३ व १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावून सबज्युनियर बुद्धिबळपटू व्ही प्रीजेश याने डबल धमाका केला. १४ वर्षांखालील वयोगटाच्या दुसऱ्या विजेतेपदाला गवसणी घालताना प्रीजेशने साखळी ५ फेऱ्यांमध्ये सर्वाधिक ४.५ गुण जिंकले. अन्य गटात हृधान भारद्वाज, आराध्य पुरो, शर्विल कनगुटकर आदी विजेते ठरले. स्पर्धेला आमदार सचिन भाऊ अहिर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
१४ वर्षाखालील गटात व्ही प्रीजेशने (४.५ गुण) प्रथम, भावा प्रनिथाने (४ गुण) द्वितीय, मुमुक्षु मिटकरने (४ गुण) तृतीय, मेहान शाहने (३.५ गुण) चौथा; १२ वर्षाखालील गटात हृधान भारद्वाजने (५ गुण) प्रथम, नैतिक पालकरने (३.५ गुण) द्वितीय, सक्षम म्हामुणकरने (३ गुण) तृतीय, अरीहा देवरुखकरने (३ गुण) चौथा; १० वर्षाखालील गटात आराध्य पुरोने (५ गुण) प्रथम, कोणकर कौलने (४ गुण) द्वितीय, विस्मित सावंतने (२ गुण) तृतीय, मार्तंड गजनेने (२ गुण) चौथा तर ८ वर्षाखालील गटात शर्विल कनगुटकरने (४.५ गुण) प्रथम, कियांश मंचेकरने (४ गुण) द्वितीय, आयुष जैठलीयाने (३.५ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण व अण्णा शिर्सेकर, शिवाजी काळे, मुंबई बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या उपविजेत्यांना गौरविण्यात आले.