जयपूर येथे जुलै महिन्यात राष्ट्रीय युथ गेम्स स्पर्धा

  • By admin
  • June 3, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह यांची माहिती

नवी दिल्ली ः युथ गेम्स काउंसिल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी राष्ट्रीय युथ गेम्स स्पर्धा जयपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह यांनी दिली.

या स्पर्धेच्या तयारीची पाहणी राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह, सहसचिव अतुल राघव, प्रमुख संयोजक आर्यन पाठक, समन्वयक तेजस कालमेघ यांनी केली. युथ गेम्स काउंसिल इंडियाच्या राष्ट्रीय समितीने जयपूर येथे भेट देऊन स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. जयपूर येथे राजस्थान विद्यापीठ अंतर्गत क्रीडांगणे व हॉटेल व्यवस्थेची या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडांगणे व निवास व्यवस्था दर्जेदार असणे गरजेचे असल्याने पदाधिकाऱ्यांनी या सुविधांवर लक्ष दिले.

चौथी राष्ट्राीय युथ गेम्स २०२५ स्पर्धा जयपूर येथे जुलै महिन्यात रंगणार आहे. राजस्थानचे समन्वयक सवाई जांगिड यांनी राष्ट्रीय समितीचे स्वागत केले. जयपूर येथील राजस्थान विद्यापीठ क्रीडा संकुलात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना युथ गेम्स कौन्सिल इंडियाचे सचिव राणा अमरसिंह, सहसचिव अतुल राघव, प्रमुख संयोजक आर्यन पाठक, समन्वयक तेजस कालमेघ यांनी या स्पर्धेची घोषणा केली.

चौथी राष्ट्रीय युथ गेम्स स्पर्धा जयपूर येथे १२, १३, १४ जुलै या कालावधीत राजस्थान विद्यापीठ क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, सिलंबम आदी खेळांचा समावेश आहे. सर्व खेळांच्या स्पर्धा या वयोगटानुसार साखळी पद्धतीने होणार आहेत, विजेत्या संघाला व खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सचिव राणा अमरसिंह यांनी दिली. ही स्पर्धा खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राणा अमरसिंह यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *