
अरिंजय वाघे शिबिरातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर
पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटना व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सौरभ धांडोरे यांच्या स्मरणार्थ मोफत उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा नुकताच समारोप झाला आहे.
या शिबिरात पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील ८० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला होता. या शिबिरात तज्ञ प्रशिक्षक, आहार तज्ञ, तज्ञ फिजिओ व तज्ञ करियर मार्गदर्शक रमन दळवी सर यांनी मोलचे मार्गदर्शन लाभले,
या शिबिरा मधील उत्कृष्ट बॉक्सर म्हणून पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात अरिंजय वाघे, श्रीनिवास कदम, गणेश कदम, गार्गी भिलारे, अनुष्का बडगु यांची निवड करण्यात आली. या पाच खेळाडूंमधून अरिंजय वाघे याची सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून निवड करण्यात आली.
या सर्व खेळाडूंना अविनाश बागवे यांनी आरोग्य खेळाडूंची दिनचर्या, खेळ निवड, कौशल्य विकास योजना, आहार, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व त्यांचे महत्व, त्याची उपयोगिता, निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये यासाठी खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या तत्परतेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले आणि पुणे शहरातून अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत तसेच उत्कृष्ट नागरिक तयार व्हावेत यासाठी सर्व खेळाडू व प्रशिक्षक तसेच संपूर्ण पालक वर्गास हे कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
प्रशिक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंचा सन्मान अविनाश बागवे यांच्या हस्ते विशेष सत्कार करून करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष मदन वाणी, आरओसी चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, उपाध्यक्ष जीवनलाल निंदाने, सदस्य अशोक मेमजादे, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश जगदाळे, बंडू गायकवाड, विशाल गव्हाणे, आंतरराष्ट्रीय कोच राम जगताप, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सलमान शेख, रेनॉल्ड जोसेफ, दिलीप मोरे, राष्ट्रीय खेळाडू अक्षय मानकर, ऋषिकेश रणदिवे तसेच संपूर्ण पालक वर्ग, संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षक ऋषिकांत वचकल यांनी केले. मदन वाणी यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग सचिव विजय गुजर यांनी केले.