
योगासन पंच परीक्षा
छत्रपती संभाजीनगर ः चिखलदरा येथे झालेल्या जिल्हास्तरीय पंच परीक्षेत मंदाकिनी जगताप, हरीभाऊ पवार, श्रद्धा पाठक, अर्चना पटेल, मंजूश्री गिरी, मधुकर चव्हाण, संध्या बोधेकर, योगिनी पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले.
दि बृहन महाराष्ट्र योग परिषद व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने योग निसर्गोपचार केंद्र चिखलदरा, जिल्हा अमरावती येथे जिल्हा स्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शालेय योगासन स्पर्धा, असोसिएशनच्या स्पर्धा व अंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा यावर प्रा अरुण खोडसकर, प्रा वैशिष्ठ खोडसकर, संजय देशमुख यांनी योगासन स्पोर्ट्स व अध्यात्मिक योग या विषयावर पाच दिवसीय पंच प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या पंच परीक्षेसाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरानंतर जिल्हा स्तरावर योगासन स्पोर्ट्स स्पर्धेत काम करण्यासाठी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या पंच परीक्षेत छत्रपती संभाजीनगरच्या मंदाकिनी जगताप, हरीभाऊ पवार, श्रद्धा पाठक, अर्चना पटेल, मंजूश्री गिरी, मधुकर चव्हाण, संध्या बोधेकर, योगिनी पाटिल यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले.
जिल्हास्तरावर उत्तीर्ण झालेल्या पंचांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गजानन सानप, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, भारतीय योग संस्थांचे उपप्रांत अधिकारी डॉ उत्तम काळवणे, डॉ पंढरीनाथ रोकडे, सचिव सुरेश मिरकर यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.