
सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांची माहिती
सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यंदाच्या नवीन क्रिकेट हंगामात नवीन उपक्रम राबवणार आहे. संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक सामन्याची सुरूवात ही राष्ट्रगीताने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यावर्षीपासून सर्व वयोगटाची निवड चाचणी ऑगस्ट महिन्यात करणार आहे. प्रत्येक गटाच्या निवड समिती निवड चाचणी झाल्यानंतर चार संघ तयार करून त्यांच्यामध्ये सामने घेऊन संभाव्य २० जणांचा संघ तयार करणे व या २० खेळाडूंचा सराव शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव चंद्रकांत रेंबुर्स यांनी दिली.
नव्या उपक्रमांविषयी अधिक माहिती देताना सचिव चंद्रकांत रेम्बुर्स म्हणाले की, यावर्षीपासून आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी रजिस्टर कार्ड देणार आहोत. त्याचबरोबर सोलापुरातील क्लब यांना रजिस्टर करून त्यांना कार्ड देणार आहोत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व गटातील खेळाडूंना जे खेळाडू संभाव्य २० मध्ये असतील त्यांचे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन एक लाखाचा इन्शुरन्स (विमा) आम्ही काढून देणार आहोत.
खेळाडू दत्तक योजना
सोलापूर जिल्ह्यातील १९ वर्षांखालील आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या ४ मुले व एका मुलीस खेळाडू दत्तक योजना आम्ही चालू करत आहोत त्यामध्ये खेळाडूस मोफत प्रशिक्षण व वर्षाचे कीट देण्यात येणार आहे असे सचिव रेम्बुर्स यांनी आवर्जून सांगितले.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन या वर्षाच्या सुरुवातीपासून पेपरलेस अकाउंट करत आहोत. अर्थात टूर्नामेंट फी, चाचणी फी व इतर कुठली ही फी क्यूआर कोडद्वारे आम्ही आमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून घेत आहोत. तसेच या वर्षापासून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन मधील जे क्रिकेट मधील मुले, मुली, अंपायर, स्कोअरर, क्लब, कोच यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्ही “सन्मान” या नावाने सन्मानचिन्ह देवून सत्कार करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या वर्षीपासून सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या टूर्नामेंटचे सामने राष्ट्रगीताने सुरुवात करणार आहोत असे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी सांगितले.