
तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीने आरसीबीचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला
अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने रोमहर्षक अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा सहा धावांनी पराभव करत पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अनुभवी विराट कोहली याने १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आरसीबी संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिला. या विजयानंतर कोहलीच्या अश्रू आवरणे कठीण झाले होते. यंदा आयपीएल इतिहासात आरसीबी संघ हा नवा विजेता संघ ठरला आहे.

पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग या धमाकेदार सलामी जोडीने ४३ धावांची भागीदारी केली. हेझलवूड याने प्रियांश आर्य याची २४ धावांची खेळी संपुष्टात आणत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर प्रभसिमरन सिंग व जोश इंगलिस या जोडीने डाव सावरला. मात्र, ही जोडी धोकादायक बनत असताना कृणाल पंड्याने प्रभसिमरन याला २६ धावांवर बाद करुन मोठे यश संपादन केले. रोमॅरियो शेफर्ड याने कर्णधार श्रेयस अय्यरला अवघ्या १ धावेवर बाद करुन सर्वात मोठा अडथळा दूर केला. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्याने पंजाबचे चाहते प्रचंड निराश झाले.

कृणाल पंड्या याने जोश इंगलिस याची २३ चेंडूत ३९ धावांची दमदार खेळी संपुष्टात आणली. त्याने चार टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. त्यानंतर नेहल वधेरा व शशांक सिंग या जोडीवर धावगती वाढवण्याची मोठी जबाबदारी आली. भुवनेश्वर याने डावातील १७वे षटकात टाकताना दोन मोठे धक्के पंजाब संघाला दिले. भुवनेश्वरने प्रथम नेहल वधेरा याला १५ धावांवर बाद केले. स्टोइनिस याने षटकार ठोकून खाते उघडले. मात्र, लगेच दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव गडगडत गेला.
यश दयाल याने उमरझाई याला (१) बाद करुन पंजाबला सातवा धक्का दिला. या धक्क्यानंतर पंजाबच्या विजयाची शक्यता मावळली. मात्र, शशांक सिंग याने हेझलवूड याला तीन षटकार व एक चौकार ठोकून झुंज दिली. पंजाबने २० षटकात ७ बाद १८४ धावा काढल्या. शशांक सिंग ३० चेंडूत ६१ धावा काढून नाबाद राहिला. त्याने सहा टोलेजंग षटकार व तीन चौकार मारले. भुवनेश्वर कुमार (२-३८), कृणाल पंड्या (२-१७) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
आरसीबीची दमदार फलंदाजी, नऊ बाद १९०
पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत नऊ विकेट गमावून १९० धावा केल्या. अर्शदीपने २० व्या षटकात तीन विकेट घेत आरसीबी संघाला १९० धावांवर रोखले. त्याने शेवटच्या षटकात शेफर्ड, कृणाल आणि भुवनेश्वरचे बळी घेतले.
टॉस गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर आरसीबी संघाची सुरुवात खराब झाली. फिल साल्ट नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा काढून बाद झाला. त्याला जेमीसन याने बाद केले. त्यानंतर विराट कोहलीने मयंक अग्रवालसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु मयंक मोठ्या शॉटचा पाठलाग करताना बाद झाला. १८ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदार १६ चेंडूंत २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला.
विराटने लिव्हिंगस्टोनसोबत ३६ धावांची भागीदारी केली. ३५ चेंडूत तीन चौकारांसह ४३ धावा काढल्यानंतर विराट कोहली अजमतुल्लाहचा बळी ठरला. जितेश शर्माने धमाकेदार खेळी केली, पण मोठ्या शॉटचा पाठलाग करताना तो विजय कुमारने बाद केला. जितेशने १० चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावांची खेळी केली.
अर्शदीप याने शेवटच्या षटकात तीन विकेट घेतल्या. त्याने २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्ड (१७ धावा), चौथ्या चेंडूवर कृणाल पंड्या (४ धावा) आणि भुवनेश्वर कुमार (१ धाव) यांचे बळी घेतले. पंजाबकडून अर्शदीप आणि जेमिसन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याच वेळी अजमतुल्लाह उमरझाई, विजय कुमार विशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.