
सोलापूर निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा ः श्रेयस, उत्कर्षा, नियान, तन्वी अव्वल
सोलापूर ः सोलापूर जिल्हास्तरीय १५ वर्षांखालील निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड याने सातपैकी सात गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या गटात करमाळाच्या बिगरमानांकित सिद्धी देशमुख हिने उत्कृष्ट खेळ करत पाचपैकी साडेचार गुणांसह विजेतेपद व आकर्षक चषक पटकाविला.
सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत श्रेयस कुदळे, वेद आगरकर, हर्ष हलमल्ली यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाल्यामुळे टाय ब्रेकमध्ये बोकोल्स गुणपद्धतीवर अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या गटात बर्शीची सान्वी गोरे, सृष्टी मुसळे यांनी चार गुणांसह दुसरा व तिसरा क्रमांक व श्रेया संदुपटला हिने ३.५ गुणांसह चौथा क्रमांक पटकावित सोलापूर जिल्हा संघातील स्थान निश्चित केले.
या चौघांचीही निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. इरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रमुख निरंजन झिरपे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, यश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात झिरपे यांनी बुद्धिबळाचे महत्व खेळाडू व पालकांना विशद करत खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्वल यश प्राप्त करून सोलापूरचा नोवलौकिक वाढवावा असे सांगितले. विजेत्या खेळाडूंना आकर्षक, मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
दहा वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस इंगळे याने, मुलींच्या गटात उत्कर्षा लोखंडे हिने चांगली कामगीरी करत अव्वल स्थान मिळवले. तसेच ७ वर्षांखालील गटाचे जेतेपद नियान कंदीकटला व तन्वी बागेवाडी हिने पटकावले. वेदिका स्वामी, हर्षदा तमदंडी, रियांश चाकोते, भुनेश्वर जाधव, सुयश चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी अभिनंदन केले.
अंतिम निकाल
१५ वर्षे मुले : १. मानस गायकवाड (७ गुण), २. श्रेयस कुदळे (५.५), ३. वेद आगरकर (५.५), ४. हर्ष हलमल्ली (५.५), ५. आरुष कंदले (५), ६. स्वानंद तपकीरे (५), ७. वेदांत मुसळे (५), ८. अरित्र दास (५), ९. श्लेष उदगीरी (५), १०. आयुष जानगवळी (५).
मुलींचा गट : १. सिद्धी देशमुख (४.५), २. सान्वी गोरे (४), ३. सृष्टी मुसळे (४), ४. श्रेया संदुपटला (३.५), ५. श्रावणी देवनपल्ली (३), ६. फराह शेख (३), ७. मानवी चौगुले (२.५), ८. अनन्या उलभगत (२), ९. आरोही दलाल (२), १०. गोवर्धनी मिठ्ठा (२).
१० वर्षे मुले : १. श्रेयश इंगळे (५.५), २. सिद्धांत कोठारी (५), ३. शशांक जमादार (५), ४. प्रथम मुदगी (४.५), ५. श्लोक चौधरी (४.५).
मुलींचा गट : १. उत्कर्षां लोखंडे (३.५), २. संस्कृती जाधव (३), ३. पृथा ठोंबरे (३), ४. दूर्वा नवले (२).
७ वर्षे मुले : १. नियान कंदीकटला (३), २. ओजस पवार (२), ३. अद्विक ठोंबरे (१), ४. विराज शेंडगे (१).