
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक सायकलिंग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे स्पीड सायकलिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे प्रमुख आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार भिकन अंबे, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. या रॅलीमध्ये ५० हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. यात अनेक डॉक्टर्स, सायकलपटू आणि इतर सदस्यांचा समावेश होता.
ही सायकल रॅली गजानन मंदिर येथून प्रारंभ झाली आणि गजानन मंदिर-सेवन हिल्स- टीव्ही सेंटर चौक-सलीम अली सरोवर-दिल्ली गेट- बाबा पेट्रोल पंप चौकमार्गे विभागीय क्रीडा संकुल असा २५ किमी अंतराचा प्रवास करत सायकल रॅलीचा समारोप विभागीय क्रीडा संकुल येथे समाप्त झाला. या रॅलीचे प्रायोजक साई पूजा ट्रॉफी शॉप यांच्यावतीने सर्व सहभागींना ट्रॉफी व मेडल प्रदान करण्यात आले.
ही रॅली दिवंगत प्रताप जाधव सर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ते सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सर्वेसर्वा होते. मागील महिन्यात त्यांचे दुःखद निधन झाले.
या रॅलीसाठी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे, अध्यक्ष विक्रम रोठे, उपाध्यक्ष अविनाश कदम व धनंजय वानखेडे, साईनाथ थोरात आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. या रॅलीतून पर्यावरण संवर्धनाचा, आरोग्य जागृतीचा आणि दिवंगत नेत्याप्रती कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला.