
विभागीय क्रीडा संकुलात आजपासून प्रारंभ
नाशिक ः लगोरी स्पोर्ट्स क्लब महाराष्ट्र आणि नाशिक लगोरी स्पोर्ट्स फाऊंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंडर १९ राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद लगोरी स्पर्धेला गुरुवारी (५ जून) प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे भव्य आयोजन नाशिक शहरात करण्यात आले आहे. नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल मैदानावर ५ ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आणि महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे व लगोरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष तुषार जाधव, नाशिक जिल्हा संघटक विलास गायकवाड यांनी दिली. या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेमध्ये भारतातून विविध राज्यातील १५ संघ सहभाग होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (५ जून) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री अदिती ताई तटकरे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांतील खेळाडू, पदाधिकारी, पंच यांची निवास व्यवस्था जनार्दन स्वामी पर्णकुटी नाशिक येथे करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी संकुलाच्या मैदानावर दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचा क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, नाशिक शहरातील खेळाडूंनी उपस्थितीत राहून आनंद घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष विलास गायकवाड यांनी केले आहे.
राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी लगोरी स्पोर्ट क्लबचे सदस्य. तुषार जाधव, क्रीडा सह्याद्रीचे अध्यक्ष विलास गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे. अधिक माहितीसाठी तुषार जाधव (9511861816), विलास गायकवाड (9921133303) क्रमांकावर संपर्क साधावा.