
टंग-कुक नवीन चेहरा
लंडन ः भारतीय संघाविरुद्धच्या २० जूनपासून सुरू होणाऱया पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करणार असून या संघात जोश टंग आणि सॅम कुक हे नवे चेहरे असतील. त्याचवेळी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याचे पुनरागमन झाले आहे.
शुक्रवारपासून (६ जून) सुरू होणाऱ्या इंडिया-अ विरुद्धच्या अनधिकृत सामन्यात टंग आणि वोक्स देखील इंग्लंड लायन्स संघाचा भाग आहेत. त्याच वेळी, जेमी ओव्हरटन देखील पुनरागमन झाले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या चार दिवसांच्या कसोटीत टंग आणि कुक अलीकडेच संघाचा भाग होते. टंग हा मध्यमगती गोलंदाज आहे, तर कुक हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. याशिवाय, ओव्हरटन देखील खेळताना दिसेल, जो वेगवान गोलंदाजीसोबत फलंदाजी करू शकतो. दुखापतीमुळे पहिल्या कसोटीसाठी संघाचा भाग नसलेल्या गस अॅटकिन्सनची कमतरता संघाला जाणवेल. २०२२ नंतर ओव्हरटन कसोटी संघात परतला आहे. ३१ वर्षीय गोलंदाजाला नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात बोटाला दुखापत झाली होती, परंतु त्याला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. याशिवाय, डिसेंबरनंतर अष्टपैलू जेकब बेथेल देखील पुनरागमन करत आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी – २० ते २४ जून लीड्स
दुसरी कसोटी – २ ते ६ जुलै बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी – १० ते १४ जुलै लंडन
चौथी कसोटी – २३ ते २७ जुलै मँचेस्टर
पाचवी कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट लंडन