पुणे वॉरियर्स महिला संघाची विजयी सलामी

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा ः श्वेता माने सामनावीर

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सलामीच्या लढतीत श्वेता मानेच्या उपयुक्त नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सोलापूर स्मॅशर्स संघाने २० षटकात ६ बाद १३९ धावा केल्या. ईश्वरी अवसरे (८), ईश्वरी सावकार (१) ही सलामीची जोडी झटपट बाद झाल्याने सोलापूर संघाशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यानंतर कर्णधार तेजल हसबनीस हिने ५४ चेंडूत ६९ धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. तिने ५ चौकार व २ षटकार खेचले. तेजल व मुक्ता मगरे यांनी ८५ चेंडूत १०१ धावांची भागीदारी केली. मुक्ता मगरे हिने ४६ चेंडूत १ चौकारासह ३६ धावा फटकावल्या.

१३९ धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने १९.४ षटकात ५ बाद १४२ धावा करून पूर्ण केले. यात सुहानी कहांडळ हिने ३८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३६ धावा, खुशी मुल्ला हिने २३ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने ५७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्वेता माने हिने २४ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. श्वेता माने व अनुजा पाटील (३० धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४३ चेंडूत ६३ धावांची महत्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

सोलापूर स्मॅशर्स : २० षटकात ६ बाद १३९ धावा (तेजल हसबनीस ६९, मुक्ता मगरे ३६, खुशी मुल्ला २-१९, अनुजा पाटील १-१९, चिन्मयी बोरपाळे १-२६) पराभूत विरुद्ध पुणे वॉरियर्स : १९.४ षटकात ५ बाद १४२ धावा (श्वेता माने नाबाद ३८), सुहानी कहांडळ ३६, अनुजा पाटील ३०, खुशी मुल्ला २३, ईश्वरी अवसरे २-२२, आरती केदार १-३३). सामनावीर – श्वेता माने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *