रायगड रॉयल्स संघाचा शानदार विजय

  • By admin
  • June 5, 2025
  • 0
  • 62 Views
Spread the love

ऋषभ राठोडची धमाकेदार ८० धावांची निर्णायक खेळी

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ राठोड (८०धावा) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्स संघावर २४ धावांनी विजय मिळवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा खेळताना २० षटकात ६ बाद १९० धावांचे आव्हान उभे केले. आघाडीच्या फळीतील फलंदाज सिद्धेश वीर (०) खाते न उघडता तंबूत परतला. त्याला वैभव दारकुंडे याने झेलबाद केले. पाठोपाठ हर्ष मोगवीराला (५) सातारा वॉरियर्सच्या राजवर्धन हंगरगेकरने झेलबाद करून रायगड रॉयल्स संघाला २ बाद १३ असे अडचणीत टाकले. यातून रायगड रॉयल्स सावरत असतानाच जगदीश झोपेने दिग्विजय पाटील (१३) याला, तर राजवर्धन हंगरगेकरने हर्ष संघवी (१८) याला बाद करून रायगड रॉयल्सची अडचण आणखी वाढवली.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या ऋषभ राठोडने ४५ चेंडूत ८० धावांची आक्रमक खेळी करत संघाचा धावफलक पुढे नेला. यात त्याने ६ चौकार व ५ उत्तुंग षटकार मारले. त्याला ऋग्वेद मोरे याने ४१ चेंडूत ३ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ४८ धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८३ चेंडूत १३० धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सातारा वॉरियर्सकडून राजवर्धन हंगरगेकरने ४२ धावात ३ गडी, वैभव दरकुंडेने ३३ धावात २ गडी बाद केले.

१९० धावांचे आव्हान सातारा वॉरियर्स संघ पेलू शकला नाही. त्यांना २० षटकात ७ बाद १७७ धावाच करता आल्या. सलामवीर पवन शहा (०) याला एमपीएलमध्ये सातारा वॉरियर्सकडून प्रथमच पदार्पण करणाऱ्या सागर जाधव याने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले व संघाला पहिला धक्का दिला. सौरभ नवले ९ धावा काढून तंबूत परतला. ओम भोसलेने २९ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्याला हर्षल काटेने ३४ चेंडूत ४ चौकार व १ षटकारासह ३८ धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रायगडच्या सागर जाधवने ओम भोसलेला स्कुप फटका मारताना त्रिफळा बाद करून त्याचा अडसर सूर केला. त्यानंतर अनिकेत पोरवाल (३१), मेहुल पटेल(२१) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. रायगड रॉयल्सकडून निखिल कदमने ३२ धावात ३ गडी टिपले. तर, तनय संघवी (२-२८), सागर जाधव (२-४१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

रायगड रॉयल्स : २० षटकात ६ बाद १९० धावा (ऋषभ राठोड ८०, ऋग्वेद मोरे ४८, हर्ष संघवी १८, अजय बोरुडे नाबाद १६, दिग्विजय पाटील १३, राजवर्धन हंगरगेकर ३-४२, वैभव दरकुंडे २-३३) विजयी विरुद्ध सातारा वॉरियर्स : २० षटकात ७ बाद १७७ धावा (ओम भोसले ४५, हर्षल काटे ३८, अनिकेत पोरवाल ३१, मेहुल पटेल २६, निखिल कदम ३-३२, तनय संघवी २-२८, सागर जाधव २-४१). सामनावीर – ऋषभ राठोड.

शुक्रवारी होणारे सामने

  • सकाळी ९.३० वाजता – रायगड रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स
  • दुपारी २.०० वाजता – रत्नागिरी जेट्स विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा.
  • सायंकाळी ७.०० वाजता – रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *