रत्नागिरी जेट्स महिला संघाची विजयी सलामी

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 47 Views
Spread the love

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग ः गौतमी नाईकचे आक्रमक अर्धशतक

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत दुसऱ्या लढतीत गौतमी नाईक (७०धावा) हिने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून स्पर्धेची शानदार सुरुवात केली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना रायगड रॉयल्स संघाने २० षटकात ८बाद १५९ धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार किरण नवगिरे (१९), भाविका आहिरे (१७), आदिती गायकवाड (१३) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर प्रज्ञा वीरकरने २८ चेंडूत ५ चौकारांसह ३४ धावा काढून संघाचा डाव सावरला. तिला यशोदा घोगरे नाबाद २३, आयेशा शेख (१६ धावा) यांनी सुरेख साथ दिली. रत्नागिरी जेट्स संघाकडून संजना वाघमोडे (२-२५), प्रियांका घोडके (१-२४), भक्ती मिरजकर (१-२२), रुतुजा काळे (१-२८) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

१५९ धावांचे लक्ष्य रत्नागिरी जेट्स संघाने १९.५ षटकात ६ बाद १६० धावा काढून पूर्ण केले. गौतमी नाईक व स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने ५६ चेंडूत ८५ धावांची भागीदारी करून संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यात गौतमी नाईकने शानदार अर्धशतक साजरे केले. डब्लूएमपीएलमधील हे दुसरे अर्धशतक ठरले. गौतमीने ४६ चेंडूत ७० धावांची आक्रमक खेळी केली. गौतमीने ११ चौकार व १ षटकार मारला. स्मृती मानधना २६ चेंडूत ३५ धावा काढून तंबूत परतली. त्यात तिने २ चौकार व २ षटकार मारले. स्मृतीला रायगड रॉयल्सच्या आदिती गायकवाडने झेलबाद केले. त्यानंतर प्रियांका घोडके (७), भक्ती मिरजकर (०) हे मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. गौतमी देखील ७० धावांवर खेळत असताना रायगडच्या आयेशा शेखने उत्तम क्षेत्ररक्षण करत तिला धावबाद केले. यावेळी रत्नागिरी जेट्ससमोर विजयासाठी ३२ चेंडूत ४२ धावा असे आव्हान होते. हे आव्हान रसिका शिंदे १४, शिवाली शिंदे नाबाद १९ यांनी धावगती कायम ठेवत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

रायगड रॉयल्स : २० षटकात ८ बाद १५९ धावा (प्रज्ञा वीरकर ३४, यशोदा घोगरे नाबाद २३, किरण नवगिरे १९, भाविका आहिरे १७, आयेशा शेख १६, आदिती गायकवाड १३, संजना वाघमोडे २-२५, प्रियांका घोडके १-२४, भक्ती मिरजकर १-२२, रुतुजा काळे १-२८) पराभूत विरुद्ध रत्नागिरी जेट्स : १९.५ षटकात ६ बाद १६० धावा (गौतमी नाईक ७०, स्मृती मानधना ३५, रसिका शिंदे १४, शिवाली शिंदे नाबाद १९, यशोदा घोगरे २-१८, रोशनी पारधी १-३७). सामनावीर – गौतमी नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *