
अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग ः वेगवान गोलंदाज चिन्मयी बोरफळेची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या लढतीत वेगवान गोलंदाज २० वर्षीय चिन्मयी बोरफळे (४-१९) हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या रायगड रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार किरण नवगिरे हिला (०) पुणे वॉरियर्सच्या चिन्मयी बोरफळेने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. पाठोपाठ भाविका अहिरे (८) देखील बाद झाली. तर चिन्मयी बोरफळेने ऋतुजा गिलबिले (०) हिला क्लीनबोल्ड बाद करून आपला वैयक्तिक तिसरा बळी घेत रायगड रॉयल्स संघाला ४.२ षटकात ३ बाद ३९ असे अडचणीत टाकले.
त्यानंतर आदिती गायकवाड १३ धावा काढून बाद झाली. ५ बाद २४ धावा अशी एकवेळ खराब स्थिती झालेली असताना आयेशा शेखने २४ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयी बोरफळेने आयेशा शेख हिला झेलबाद करून स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवला. तळातील फलंदाज यशोदा घोगरे (नाबाद १६) व रोशनी पारधी (नाबाद १४) यांनी आठव्या विकेटसाठी १० चेंडूत २३ धावांची भागीदारी करून रायगड रॉयल्सला १०२ धावांपर्यंत मजल गाठून दिली. पुणे वॅरियर्सकडून चिन्मयी बोरफळेने १९ धावात ४ गडी महत्वपूर्ण टिपले. समृद्धी डाळेने १९ धावात २ गडी तर, इशिता खळेने १३ धावात १ गडी बाद केला.
१०२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुणे वॉरियर्स संघाने हे आव्हान १४.५ षटकात २ बाद १०३ धावा करून पूर्ण केले. अक्षया जाधवने ३७ चेंडूत ५चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावांची संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अक्षया व खुशी मुल्ला (२९धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ३१ धावांची भागीदारी केली. पण प्रज्ञा वीरकरने खुशी मुल्लाला त्रिफळा बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर अक्षयाने श्वेता माने (नाबाद २३धावा) हिच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : २० षटकात ८ बाद १०२ धावा (आयेशा शेख २४, यशोदा घोगरे नाबाद १६, रोशनी पारधी नाबाद १४, आदिती गायकवाड १३, इशा पाठारे ११, चिन्मयी बोरफळे ४-१९, समृद्धी डाळे २-२९, इशिता खळे १-१३) पराभूत विरुद्ध पुणे वॉरियर्स : १४.५ षटकात २ बाद १०३ धावा (अक्षया जाधव नाबाद ३६, खुशी मुल्ला २९, श्वेता माने नाबाद २३, प्रज्ञा वीरकर १-४, रोशनी पारधी १-१८). सामनावीर – चिन्मयी बोरफळे.