डॉ हेगडे चषक शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव, ओमकारची विजयी सलामी

  • By admin
  • June 6, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सहकार्याने सुरू झालेल्या माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क शालेय एकेरी कॅरम स्पर्धेत डॉ अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेराव व ओमकार देसाई, वरळी मुंबई पब्लिक स्कूलचा सिद्धांत मोरे आदींनी सलामीचे सामने जिंकले. 

प्रथमपासून आक्रमक खेळासह अचूक  फटकेबाजी करीत ध्रुव भालेराव याने जीके मार्ग मुंबई पब्लिक स्कूलच्या नैतिक लादेला २५-० असा नील गेम दिला आणि दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला.

परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात प्रत्येक बोर्डमध्ये राणीवर कब्जा मिळवीत ओमकार देसाईने नील भालेरावचे आव्हान १५-२ असे संपुष्टात आणले. सिद्धांत मोरेने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत आयुषचा १९-७ असा चुरशीचा पराभव केला. 
या स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह ३२ खेळाडूंनी भाग घेतला आहे. माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते व विलास डांगे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी मंगेश चिंदरकर यांचे देखील वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रशिक्षक सचिन शिंदे, कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अर्जुन कालेकर आदी पंचाचे कामकाज करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *