सोलापूर स्मॅशर्स महिला संघाचा पहिला विजय  

  • By admin
  • June 7, 2025
  • 0
  • 95 Views
Spread the love

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा ः शरयू कुलकर्णी सामनावीर

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत तिसऱ्या दिवशी चौथ्या लढतीत आरती केदार (३-१०), मुक्ता मगरे (२-१७), शरयू कुलकर्णी (२-३३) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसह तेजल हसबनीस (नाबाद ४३ धावा), ईश्वरी अवसरे (३७ धावा) यांनी केलेल्या चमकदार खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला निर्णय सोलापूरच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. सलामीवीर स्म्रिती मानधना (१) हिला यष्टीच्या मागे शरयू कुलकर्णीने झेलबाद केले व रत्नागिरी संघाला पहिला मोठा धक्का दिला. गौतमी नाईक अवघ्या २० धावांवर तंबूत परतली. शरयू कुलकर्णी हिने तिला झेलबाद केले. शिवाली शिंदे (२५धावा), अनुश्री स्वामी (२० धावा), ज्ञानदा कदम (१५ धावा), प्रियांका घोडके (१७ धावा) यांना फारशी मोठी खेळी करता आली नाही. सोलापूर स्मॅशर्सकडून आरती केदारने १० धावात ३ गडी, मुक्ता मगरे (२-१७), शरयू कुलकर्णी (२-३३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून रत्नागिरी जेट्स संघाला १२० धावांवर रोखले.

हे आव्हान सोलापूर स्मॅशर्स संघाने १६ षटकात २ बाद १२३ धावा काढून पूर्ण केले. ईश्वरी अवसरे व ईश्वरी सावकार या सलामी जोडीने ५४ चेंडूत ५६ धावांची सलामी दिली. ईश्वरी सावकार १६ धावांवर असताना धावबाद झाली. त्यानंतर ईश्वरी अवसरेने ३३ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यात तिने ५ चौकार व १ षटकार मारला.  त्यानंतर तेजल हसबनीसने २३ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी सुरेख खेळी केली. तिने आपल्या खेळीत ६ चौकार व १ षटकार मारला. तेजलने मुक्ता मगरे (नाबाद १६धावा) हिच्या समवेत ३५ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.

संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : १९.३ षटकात सर्वबाद १२० धावा (शिवाली शिंदे २५, अनुश्री स्वामी २०, गौतमी नाईक २०, ज्ञानदा कदम १५, आरती केदार ३-१०, मुक्ता मगरे २-१७, शरयू कुलकर्णी २-३३) पराभूत विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स : १६ षटकात २ बाद १२३ धावा (तेजल हसबनीस नाबाद ४३, ईश्वरी अवसरे ३७, मुक्ता मगरे नाबाद १६, नंदिनी सोनावणे १-२१). सामनावीर – शरयू कुलकर्णी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *