
पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जगन्नाथ लकडे यांनी शुक्रवारी स्वीकारला आहे.
पुणे जिल्ह्याचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून जगन्नाथ लकडे यांची प्रशासकीय बदलीने नियुक्त झाली आहे. लकडे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. जगन्नाथ लकडे हे अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी २००२ मध्ये श्रीलंका येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लकडे यांनी पदके संपादन केलेली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना २००३-०४ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आहे.
जगन्नाथ लकडे यांनी सेनादलात देखील सेवा बजावलेली आहे. शासनाने त्यांना सेनादलातील सेवेनंतर थेट नियुक्ती द्वारे तालुका क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती केले होते. त्यांनी कुर्ला (मुंबई शहर), बारामती (जिल्हा पुणे) या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २०२२ मध्ये लकडे यांना जिल्हा क्रीडा अधिकारी पदी पदोन्नती मिळाली असून त्यांनी लातूर येथे २०२२ ते २०२५ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांचे प्रभावी विभागीय उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. लातूर विभागीय क्रीडा संकुलामध्ये त्यांच्या कार्यकाळात अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
जगन्नाथ लकडे यांनी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांनी जगन्नाथ लकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.