
अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धा – अक्षय वैकर सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या दिवशी अक्षय वैकर (२-१३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून सातारा वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सलामीवीर पवन शहाने ३२ चेंडूत ४० धावांची आक्रमक खेळी केली. त्यात १ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. सौरभ नवले १२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर पवन शहा व हर्षल काटे (२१ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ५० धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
नवव्या षटकात अक्षय वैकरने पवन शहाला झेल बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर हर्षल काटे जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षय वैकरच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद करून सातारा संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. ओम भोसले २५ धावा काढून तंबूत परतला. सातारा वॉरियर्स संघ १५ षटकात ४ बाद ११६ धावा अशा स्थितीत असताना पाऊस सुरू झाला. पावसाच्या विश्रांतीनंतर ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयासाठी ५ षटकात ५४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
सुधारित ५४ धावांचे आव्हान ईगल नाशिक टायटन्सने ४.३ षटकात २ गड्यांच्या बदल्यात ५४ धावा करून पूर्ण केले. राजवर्धन हंगरगेकरच्या पहिल्याच षटकात अर्शीन कुलकर्णी याने जोरदार फटकेबाजी करत संघाला बिनबाद २२ धावा उभारून दिल्या. त्यात त्याने तीन उत्तुंग षटकार मारले. पण पुढच्याच षटकात वैभव दारकुंडेने शेवटच्या चेंडूवर अर्शिनला झेलबाद केले. मंदार भंडारी (९) याला विवेक शेलारने झेलबाद करून नाशिकला दुसरा धक्का दिला. ओम भोसले याने त्याचा सुंदर झेल टिपला. त्यानंतर साहिल पारीख नाबाद ९, अथर्व काळे नाबाद ८ यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
सातारा वॉरियर्स : १५ षटकात ४ बाद ११६ धावा (पवन शहा ४०, हर्षल काटे २५, ओम भोसले २५, सौरभ नवले १२, अक्षय वैकर २-१३, मनोज इंगळे १-१५) पराभूत विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स : ४.३ षटकात २ बाद ५४ धावा (अर्शिन कुलकर्णी १९, साहिल पारीख नाबाद ९, अथर्व काळे नाबाद ८, विवेक शेलार १-१९, वैभव दारकुंडे १-३). सामनावीर – अक्षय वैकर.