
रविवारी होणार रंगतदार सामने
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महिलांच्या अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रविवारी (८ जून) दुपारी २ वाजता होणाऱ्या सामन्यात पुणे वॉरियर्स संघाला सलग तिसऱ्या विजयाची आशा असेल. पुणे वॉरियर्स संघासमोर स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचे आव्हान असेल. तर सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या सामन्यात सोलापूर स्मॅशर्स संघ रायगड रॉयल्सला भिडेल.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्मृती मानधनाच्या रत्नागिरी संघाला सोलापूर संघाने आठ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात स्मृती मानधनासह आघाडीची फलंदाज गौतमी नाईक अपयशी ठरली होती. परंतु, सलामीच्या सामन्यात याच जोडीने रत्नागिरीच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. रत्नागिरीच्या हाय-परफॉर्मन्स प्रशिक्षक आणि माजी भारतीय खेळाडू देविका पळशीकर यांना आशा असेल की स्मृती आणि गौतमीकडून रायगड विरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती होईल व संघाची गाडी पुन्हा रुळावर येईल.
दुसऱ्या बाजूला, पुणे वॉरियर्स संघाने त्यांचे सलामीची दोन्ही सामने जिंकले आहेत. परंतु, त्यांना कर्णधार अनुजा पाटीलच्या दुखापतीची चिंता असेल. रायगड रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना समोरच्या फलंदाजाने मारलेल्या चेंडूपासून बचाव करताना तिच्या हाताला दुखापत झाल्याने तिला जखमी निवृत्त व्हावं लागलं होतं. वेगवान गोलंदाज चिन्मयी बोरपळेच्या (४-१९) चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी रायगडचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे, रत्नागिरी विरुद्धच्या सामन्यात त्यांचं पारडं जड असेल.
रविवारच्या पहिल्या सामन्यात तेजल हसबनीसचा सोलापूर स्मॅशर्स संघासमोर रायगड रॉयल्स संघाचे आव्हान असेल. फिरकी गोलंदाज मुक्ता मगरे, आरती केदार आणि आंचल अगरवाल ह्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनंतर तेजलच्या आक्रमक नाबाद ४३ धावांच्या जोरावर सोलापूरने रत्नागिरीचा पराभव केला होता. तेजलला आशा असेल कि तिच्या संघाकडून रत्नागिरी विरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती होईल.
किरण नवगिरेच्या रायगड रॉयल्स संघाला अजूनपर्यंत स्पर्धेत एकही विजय मिळवता आलेला नाहीये. सलामीच्या सामन्यात चुरशीच्या लढतीत त्यांचा रत्नागिरी जेट्स संघाकडून पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने त्यांना सहज मात दिली होती. पहिल्या सामन्यात रायगडच्या फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीतील अपयशाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी निराशा केली होती. कर्णधार किरण नवगिरेला आता अपेक्षा असेल की सोलापूर विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबी जमून येतील व संघाला पहिला विजय प्राप्त होईल.