
निकित धुमाळचे भेदक गोलंदाजीसह पाच बळी, यश नाहर सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या दिवशी सहाव्या लढतीत यश नाहर (८२ धावा), ऋषिकेश सोनावणे (५८ धावा), सुरज शिंदे (नाबाद ४०) यांनी केलेल्या अफलातून फलंदाजीसह निकित धुमाळ (५-३९) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा संघाने रायगड रॉयल्स संघाचा ९९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४एस पुणेरी बाप्पा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २०२ धावांचे आव्हान उभे केले. २०० धावांचा टप्पा पार करणारा ४ एस पुणेरी बाप्पा हा या हंगामातील पहिला संघ ठरला. रायगडच्या तनय संघवीने मुर्तझा ट्रंकवाला (४) त्रिफळा बाद करून पुणेरी बाप्पा संघाला पहिला धक्का दिला.

सलामवीर यश नाहरने झंझावती फलंदाजी केली. रायगडच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. त्याने ५२ चेंडूत ८ चौकार व ४ षटकार ठोकत ८२ धावांची खेळी केली. त्याला ऋषिकेश सोनावणेने ४० चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८० चेंडूत १२७ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. ही भागीदारी एमपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली. हे दोघेही बाद झाल्यावर सुरज शिंदेने अफलातून फटकेबाजी करत १२ चेंडूत १ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा चोपल्या व संघाला २०२ धावांचा टप्पा गाठून दिला.
२०२ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स पेलू शकला नाही. त्यांचा डाव १३.१ षटकात सर्वबाद १०३ धावावर संपुष्टात आला. हर्ष मोगवेराला सुरज शिंदेने धावबाद करून रायगडला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने आपल्या तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर दिग्विजय पाटील (७), तिसऱ्या चेंडूवर ऋग्वेद मोरे (०) याला त्रिफळा बाद करून रायगड संघाला अडचणीत टाकले. निकित धुमाळने सिद्धेश वीर (१८) याला झेलबाद करून रायगड रॉयल्सची स्थिती ४ बाद २९ अशी बिकट केली.
त्यानंतर निकित धुमाळने पुन्हा सातव्या षटकात हर्ष संघवी (९), विकी ओस्तवाल (९) यांना बाद करून रायगडची अडचण आणखी वाढवली. ऋषभ राठोडने एकाबाजूने लढताना २१ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. पण नवव्या षटकात अजय बोरुडे (४) आणि १३व्या षटकात ऋषभ राठोड (४६) याला निकितने बाद करून यंदाच्या स्पर्धेत ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला. या बरोबरच निकित धुमाळ हा एमपीएलमधील आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला असून त्याने आतापर्यंत २ सामन्यात मिळवून ८ बळी टिपले आहेत.
संक्षिप्त धावफलक
४ एस पुणेरी बाप्पा : २० षटकात ४ बाद २०२ (यश नाहर ८२, ऋषिकेश सोनावणे ५८, सुरज शिंदे नाबाद ४०, सागर जाधव १-३१, निखिल कदम १-३७, तनय संघवी १-४४) विजयी विरुद्ध रायगड रॉयल्स : १३.१ षटकात सर्वबाद १०३ (ऋषभ राठोड ४६, सिद्धेश वीर १८, निकित धुमाळ ५-३९, सचिन भोसले २-१५, रोशन वाघसरे १-८). सामनावीर – यश नाहर.