
किरण पवार चषक अंडर १९ क्रिकेट – भंडारी अकादमी संघाशी आज लढत
सोलापूर ः किरण पवार स्मृती चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत के पी क्रिकेट अकॅडमी संघाने मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा ६ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना भंडारी क्रिकेट अकादमी संघाबरोबर सोमवारी जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर होणार आहे.

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही स्पर्धा डॅनिश केकने पुरस्कृत केली आहे. रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय के पी क्रिकेट अकॅडमीचा कर्णधार यश मंगरुळे याने घेतला. हा निर्णय सार्थक ठरवत डावखुरा गोलंदाज जयंत मित्रगोत्री याने प्रभावी गोलंदाजी करत ८ षटकात ३ निर्धाव षटक टाकत केवळ १३ धावांत ५ बळी मिळविले. त्यास साथ देताना कर्णधार यश मंगरुळे ३ व मयंक पात्रेने २ बळी घेतले. मॉडेलकडून फलंदाजी करताना ओंकार शेळके २०, चांद शेख १७ व संस्कार गवळीने १७ धावा करीत संघाची धावसंख्या २७ षटकात सर्वबाद १०६ धावा अशी केली.
विजयी १०७ धावांचे लक्ष्य के पी क्रिकेट अकॅडमीने ४ गडी गमावत गाठले. अकादमीच्या ओम चव्हाण याने तडफदार फलंदाजी करीत ४४ चेंडूत आठ चौकारांसह ५३ धावा काढल्या. आदित्य बंडगरने पाच चौकारांसह ३२ चेंडूत २३ धावा काढून केवळ सतराव्या षटकांत १०७ धावांचा पाठलाग करत आपल्या संघास विजयी केले. १३ धावांत ५ बळी टिपणारा जयंत मित्रगोत्री सामन्याचा मानकरी ठरला.