 
            पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या दिवशी सहाव्या लढतीत खुशी मुल्ला (६८ धावा) हिने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ५ धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना पुणे वॉरियर्स संघाने २० षटकात ८ बाद १५१ धावा केल्या. सलामवीर खुशी मुल्लाने आक्रमक खेळी करत ५४ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तिने ८ चौकार व १ षटकार मारला. सुहानी कहांडल (१३ धावा), अक्षया जाधव (१५ धावा) हे दुहेरी धावसंख्या करून बाद झाले.
त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी खुशी मुल्ला व अनुजा पाटील यांनी ४६ चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. अनुजा पाटीलने २२ चेंडूत १ चौकार व १ षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. रत्नागिरी जेट्सकडून संजना वाघमोडे (२-१७), प्रियांका घोडके (२-३२) यांनी प्रत्येकी दोन, तर भक्ती मिरजकर (१-२०), अनुश्री स्वामी (१-११) यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

१५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रत्नागिरी जेट्स संघ २० षटकात ८ बाद १४६ धावाच करू शकला. सलामीच्या जोडीत बदल करण्यात आला. पण वरच्या फळीतील फलंदाज गौतमी नाईक (१५), अनुश्री स्वामी (२), ज्ञानदा निकम (०), भक्ती मिरजकर (५) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यावेळी संघ ४.२ षटकात ४ बाद २६ असा अडचणीत होता. पाचव्या क्रमांकास फलंदाजीस उतरलेल्या भारतीय क्रिकेटपटू स्मृता मानधनाने ३४ चेंडूत ६१ धावांची सुरेख खेळी केली. तिने आपल्या खेळीत ६ चौकार व ३ षटकार ठोकले. स्मृती मानधना व प्रियांका घोडके यांनी सहाव्या विकेटसाठी ८६ चेंडूत ६३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी चिन्मयी बोरफळेने स्मृती मानधनाला झे बाद केले व सामन्यात रंगत आणली. यावेळी रत्नागिरीला विजयासाठी ३१ चेंडूत ४० धावांची आवश्यकता होती. त्यानंतर प्रियांका घोडके (२५ धावा), तेजस्विनी यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.  
 
संक्षिप्त धावफलक 
पुणे वॉरियर्स : २० षटकात ८ बाद १५१ धावा (खुशी मुल्ला ६८, अनुजा पाटील २७, अक्षया जाधव १५, श्वेता माने १५, सुहानी कहांडल १३, संजना वाघमोडे २-१७, प्रियांका घोडके २-३२, भक्ती मिरजकर १-२०, अनुश्री स्वामी १-११) विजयी विरुद्ध रत्नागिरी जेट्स : २० षटकात ८ बाद १४६ धावा (स्मृती मानधना ६१, प्रियांका घोडके २५, गौतमी नाईक १५, तेजस्विनी नाबाद १६, चिन्मयी बोरफळे ३-२३, अनुजा पाटील २-२०, इशिता खळे १-२६). सामनावीर –  खुशी मुल्ला.



