रत्नागिरी जेट्स संघाचा पहिला विजय

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

सामनावीर अझीम काझीचे आक्रमक नाबाद अर्धशतक

पुणे ः  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधार अझीम काझी (नाबाद ६२ धावा) याने केलेल्या सुरेख अर्धशतकी खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सातारा वॉरियर्स संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. रत्नागिरीच्या प्रदीप दाढेने पवन शहा (१), मेहुल पटेल (१) यांना एकापाठोपाठ बाद करून सातारा संघाला अडचणीत टाकले.

सलामवीर ओम भोसलेने एक बाजू सांभाळताना २१ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यात त्याने ६चौकार व २ षटकार मारले. ओम व सौरभ नवले (२२धावा) याच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ३९ धावा केल्या. ही भागीदारी रंगत असतानाच प्रदीप दाढेने ओम भोसलेला झेल बाद करून सातारा संघाला तिसरा धक्का दिला. जगदीश झोपे (३), सौरभ नवले (२२) हे एकापाठोपाठ बाद झाल्यामुळे सातारा संघ १२ षटकात ५ बाद ९२ धावा अशा बिकट स्थितीत होता. त्यानंतर हर्षल काटेने २१ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह  ३५ धावा, अनिकेत पोरवालने नाबाद २५ धावा, राजवर्धन हंगरगेकरने १५ धावा काढून संघाला निर्धारित षटकात १५९ धावा उभारून दिल्या.

१५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हे आव्हान रत्नागिरी जेट्सने १८ षटकात ५ बाद १६० धावा करून पूर्ण केले. रत्नागिरी जेट्सच्या धीरज फटांगरे व अथर्व धर्माधिकारी यांनी ३३ धावांची सलामी दिली. साताराच्या विवेक शेलारने तिसऱ्या षटकात चौथ्या चेंडूंवर धीरज फटांगरेला १७ धावांवर झेल बाद करून तंबूत परत पाठवले. याच षटकात त्याने पुढच्याच चेंडूवर जोइरुबेन्सन परदेशीला त्रिफळा बाद केले होते. पण हा चेंडू पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर पुढच्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर राजवर्धन हंगरगेकरने अथर्व धर्माधिकारी (१८) याला झेलबाद करून रत्नागिरी संघाची अडचण आणखी वाढवली. 

अझीम काझीला जोइरुबेन्सन परदेशीने २१ धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ५८ धावांची भागीदारी करून संघाची बाजू अधिक भक्कम केली. त्यानंतर अझीम काझी व अभिषेक पवार (२१) यांनी पाचव्या विकेटसाठी २४ चेंडूत ३४ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. अझीम काझीने कर्णधाराला साजेशी खेळी करत ४२ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने ६ चौकार व ३ षटकार ठोकले.

संक्षिप्त धावफलक
सातारा वॉरियर्स : २० षटकात ८ बाद १५९ धावा (ओम भोसले ४३, हर्षल काटे ३५, अनिकेत पोरवाल नाबाद २५, सौरभ नवले २२, राजवर्धन हंगरगेकर १५, प्रदीप दाढे ३-२९, साहिल छुरी १-१७, सत्यजित बच्छाव १-२९, विजय पावले १-३१, दिव्यांग हिंगणेकर १-३३) पराभूत विरुद्ध रत्नागिरी जेट्स : १८ षटकात ५ बाद १६० धावा (अझीम काझी नाबाद ६२, अभिषेक पवार २१, जोइरुबेन्सन परदेशी २१, अथर्व धर्माधिकारी १८, धीरज फटांगरे १७, शामसुझमा काझी २-१७, राजवर्धन हंगरगेकर १-२६, विवेक शेलार १-३७, वैभव दारकुंडे  १-४४). सामनावीर – अझीम काझी.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *