
विभागीय क्रीडा संकुलात ४५ लाख रुपये खर्चुन उभारली आधुनिक सुविधा
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुलात सुमारे ४५ लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट सुविधेचे लोकार्पण नुकतेच थाटात करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे विविध खेळात नामांकित खेळाडू निर्माण होत असून खेळाडूंना प्रोत्साहन, प्रशिक्षण व दैनंदिन सरावासाठी तसेच खेळाडूंना सर्वात चांगल्या सोई-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय क्रीडा संकुल येथील मल्टीपर्पज हॉल येथे जिल्हा वार्षिक योजनांतर्गत नाविण्यपूर्ण योजनेच्या प्राप्त निधी ४५ लाख रुपयांतून सिंथेटीक बॅडमिंटन कोर्टची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
या बॅडमिंटन कोर्टवर नियमित ६०० ते ७०० खेळाडू, नागरिक नियमित सराव करीत असतात. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य, राष्ट्रीय खेळाडूंची विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य संपादन करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सिंथेटीक बॅडमिंटन कोर्टचा लाभ होईल. सिंथेटीक बॅडमिंटन कोर्ट सारख्या सुविधा खेळाडू व नागरिकास पुरविल्यास निर्माण होणारे राज्य व राष्ट्रीय खेळाडूंमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे महाराष्ट्रात व देशामध्ये नावलौकिक होऊन क्रीडा सुविधांचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल.
पालकमंत्री संजय शिरसाट, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व भाजप नेते शिरीष बोराळकर, जिल्हा सचिव सिद्धार्थ पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी आभार मानले.