
ईगल नाशिक टायटन्ससमोर आव्हान पुणेरी बाप्पाचे
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी (१० जून) क्रिकेट चाहत्यांना सर्व सहा संघातील धमाकेदार खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावर ही स्पर्धा रंगत आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या पहिल्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघ रायगड रॉयल्स संघाला भिडेल. रत्नागिरी जेट्सने पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर चौथ्या सामन्यात सातारा वॉरियर्स संघाला पराभूत करुन स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. वेगवान गोलंदाज प्रदीप दाढे (३-२९) व कर्णधार अझीम काझी (नाबाद ६२) यांनी रत्नागिरीच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. रायगड रॉयल्सला त्यांच्या शेवटच्या सामन्यात ४ एस पुणेरी बाप्पाकडून ९९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
मंगळवारी दुपारी २ वाजता होणाऱया सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाची सातारा वॉरियर्स संघाशी लढत होईल. पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर सातारा संघाला पहिल्या विजयाची अपेक्षा असेल. राहुल त्रिपाठीच्या कोल्हापूर संघाने रत्नागिरीचा पराभव करुन स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती, पण दुसऱ्या सामन्यात त्यांना ईगल नाशिक टायटन्स संघाने पाणी पाजले होते.
मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या सामन्यात, ईगल नाशिक टायटन्स व ४ एस पुणेरी बाप्पा या स्पर्धेतील दोन अपराजित संघात लढत होईल. प्रशांत सोळंकींच्या नाशिक संघाने आत्तापर्यंत रत्नागिरी, सातारा व कोल्हापूर संघाला धूळ चारली आहे, तर पुण्याच्या संघाने रत्नागिरी व रायगड संघाला धूळ चारली आहे.