
छत्रपती संभाजीनगर ः कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेंडक्राफ्टर्स (TrendCrafters) या विद्यार्थ्यांच्या टीमने पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाला रोख १५ लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले असून पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
ही स्पर्धा महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ जून दरम्यान कृषी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत जगभरातून सुमारे ८०० हून अधिक प्रोजेक्ट्सची नोंदणी झाली होती. यापैकी १४० प्रोजेक्ट्सची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली, ज्यामध्ये सीएसएमएसएस छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण ३२ विद्यार्थी व ०३ प्राध्यापक वृंद यांच्यासह ८ टीम्स सहभागी झाल्या होत्या. जागतिक स्तरावर निवड झालेल्या १४० टीम्सपैकी ८ टीम्स एका महाविद्यालयातून निवडल्या जाणे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
या स्पर्धेत एकूण ८ ट्रॅक्स (विभाग) होते, ज्यामधून शेतीतील विविध समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करणाऱ्या उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या ‘ट्रेंडक्राफ्टर्स’ टीमने सादर केलेल्या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकावला. या संपूर्ण प्रक्रियेत प्राध्यापक डॉ. अश्विनी गवळी यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे आणि सचिव पद्माकरराव मुळे यांनी टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, एचआर व्यवस्थापक अनिल तायडे आणि जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य डॉ देवेंद्र भुयार, विभाग प्रमुख डॉ श्रीनिवास झंवर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोट

आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेत आमच्या टीमने अत्यंत अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. तुमची कल्पनाशक्ती, समस्या-समाधान कौशल्य आणि सांघिक कामाची क्षमता या गुणांनी तुम्हाला पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
तुमची ही कामगिरी तुमच्या कठोर परिश्रम, निरंतर प्रयत्न आणि तंत्रज्ञानावरील तुमच्या ज्ञानाचे प्रतीक आहे. हॅकेथॉन स्पर्धा अशा प्रतिभाशाली विद्यार्थींना त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याची संधी देते आणि तुम्ही यात यशस्वी झाला आहात.
- समीर मुळे.