सोलापूर स्मॅशर्सची आगेकूच कायम

  • By admin
  • June 9, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

ईश्वरी सावकार, तेजल हसबनीस विजयाचे शिल्पकार

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या दिवशी सातव्या लढतीत ईश्वरी सावकार (नाबाद ७५धावा), तेजल हसबनीस (७०धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा १९ धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रत्नागिरी जेट्सने नाणेफेक जिंकून सोलापूर स्मॅशर्स संघाला फलंदाजीस आमंत्रित केले. रत्नागिरीच्या ऋतुजा काळेने पहिल्याच चेंडूवर सोलापूरच्या ईश्वरी अवसरे (०) हिला पायचीत करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार तेजल हसबनीस हिने ईश्वरी सावकारच्या साथीत रत्नागिरीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 

स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या तेजलने चौफेर फटकेबाजी करताना ३१ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. तेजलने ३९ चेंडूत ७० धावांची झंझावती खेळी केली. तिने ११ चौकार व २ षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. दुसऱ्या बाजूला ईश्वरी सावकारने आक्रमक पवित्रा स्वीकारत ६२ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. तिने ७ चौकार खेचले. ईश्वरी सावकारने या स्पर्धेत सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तेजल हसबनीस व ईश्वरी सावकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० चेंडूत १३०धावांची विक्रमी भागीदारी केली. ही भागीदारी स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली. रत्नागिरीच्या अनुश्री स्वामीने तेजलला (७० धावा) झेलबाद केले. सोलापूर स्मॅशर्स संघाने निर्धारित षटकात ५ बाद १७० धावांचे भक्कम आव्हान उभे केले.

१७० धावांचे घेऊन उतरलेल्या रत्नागिरी जेट्स संघाचा डाव १९. १ षटकात १५१ धावांवर संपुष्ठात आला. गौतमी नाईक व अनुश्री स्वामी या जोडीने आक्रमक खेळी करताना १५ चेंडूत ३८ धावाची सलामी दिली. विशेष म्हणजे हे या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक ठरले. गौतमीने पहिल्याच षटकात २ चौकार व ३ षटकार ठोकत उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात आक्रमक फटका मारताना गौतमी नाईकला सोलापूरच्या मुक्ता मगरे हिने झेलबाद केले. अनुश्री स्वामी (७), भक्ती मिरजकर (६), शिवाली शिंदे (६) स्वस्तात बाद झाल्या. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने २९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यात तिने ६ चौकार व २ षटकार मारले. पण सोलापूरच्या लक्ष्मीदेवी यादवच्या गोलंदाजीवर मानधनाला दामिनी बनकरने यष्टिचित करून सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली. ज्ञानदा कदम (१९), रसिका शिंदे (१३) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. सोलापूर स्मॅशर्सकडून लक्ष्मीदेवी यादवने ३५ धावात ३ बळी घेतले. तर मुक्ता मगरेने १८ धावात २ गडी आणि ईश्वरी अवसरेने २३ धावात १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक
सोलापूर स्मॅशर्स : २० षटकात ५ बाद १७० धावा (ईश्वरी सावकार नाबाद ७५, तेजल हसबनीस ७०, मुक्ता मगरे ११, अनुश्री स्वामी ३-२२, ऋतुजा काळे १-३१) विजयी विरुद्ध रत्नागिरी जेट्स : १९.१ षटकात सर्वबाद १५१ धावा (स्मृती मानधना ५२, गौतमी नाईक ३१, ज्ञानदा कदम १९, रसिका शिंदे १३, लक्ष्मीदेवी यादव ३-३५, मुक्ता मगरे २-१८, ईश्वरी अवसरे १-२३). सामनावीर – ईश्वरी सावकार.         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *