
अझीम काझी, धीरज फटांगरे, सत्यजित बच्छाव विजयाचे शिल्पकार
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ६७ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रत्नागिरी जेट्स संघाकडून कर्णधार अझीम काझी सामन्याचा मानकरी ठरला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून रत्नागिरी जेट्सला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. अथर्व धर्माधिकारी २३ धावा काढून बाद झाला. त्याने ४ चौकार मारले. पॉवरप्लेमध्ये रत्नागिरी जेट्सच्या अथर्व धर्माधिकारी व धीरज फटांगरे या सलामी जोडीने ३६ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. धीरज फटांगरे याने धमाकेदार फलंदाजी केली. धीरजने ४३ चेंडूत ५७ धावा काढून अर्धशतक झळकावले. त्यात त्याने ३ चौकार व ३ षटकार ठोकले.
कर्णधार अझीम काझीने आक्रमक फटकेबाजी करत २९ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. अझीमने धीरजच्याच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी४०चेंडूत ४६ धावांची भागीदारी करून संघाची स्थिती अधिक भक्कम केली. ही भागीदारी रंगत असतानाच १४व्या षटकात रायगडच्या हितेश वाळुंज याने रत्नागिरीच्या धीरजला झेलबाद केले. धीरज याने कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका रवींद्र जाधव याने अफलातून झेल घेऊन पकडला.
एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना अझीमने ३८ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर किरण चोरमले (नाबाद १२), दिव्यांग हिंगणेकर (११) यांनी धावा काढून संघाला निर्धारित शतकात ४ गड्यांच्या बदल्यात १८७ धावांचे आव्हान उभे करून दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. रत्नागिरीच्या प्रदीप दाढे, किरण चोरमले, प्रथमेश गावडे यांच्या भेदक माऱ्यापुढे ऋग्वेद मोरे (३), सिद्धेश वीर (१८), दिग्विजय पाटील (७), हर्ष मोगवीरा (२), ऋषभ राठोड (५) हे वरच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे रायगड संघ ७.१ षटकात ५ बाद ३७ अशा बिकट स्थितीत होता. त्यानंतर नीरज जोशी (१९), रवींद्र जाधव (१२) यांची भागीदारी लयात येत असतानाच कर्णधार अझीमने फिरकीपटू सत्यजित बच्छाव याला गोलंदाजीस आणले. सत्यजित याने नीरज जोशीला झेलबाद तर, रवींद्र जाधवला त्रिफळा बाद करून रायगड संघाचे आव्हान अधिक बिकट केले. साव्या गजराजने १६ धावा काढून थोडासा प्रतिकार केला. विशेष म्हणजे रत्नागिरीचा यष्टीरक्षक अभिषेक पवारने अप्रतिम चार झेल घेत संघाच्या विजयाला हातभार लावला. रायगड रॉयल्स २० षटकात ९बाद १२० धावाचा करू शकला.
रत्नागिरी जेट्स संघाकडून प्रदीप दाढे, किरण चोरमले व प्रथमेश गावडे या आघाडीच्या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यात फिरकीपटू सत्यजित बच्छावचा मारा प्रभावी ठरला. त्याने १७ धावात ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : २० षटकात ४ बाद १८७ धावा (अझीम काझी ७२, धीरज फटांगरे ५७, अथर्व धर्माधिकारी २३, किरण चोरमले नाबाद १२, दिव्यांग हिंगणेकर ११, सिद्धेश वीर १-२३, हितेश वाळुंज १-२६) विजयी विरुद्ध रायगड रॉयल्स : २० षटकात ९ बाद १२० धावा (नीरज जोशी १९, सिद्धेश वीर १८, साव्या गजराज १६, रवींद्र जाधव १६, सत्यजित बच्छाव ३-१७, प्रथमेश गावडे २-१८, प्रदीप दाढे २-१६, किरण चोरमले २-३१). सामनावीर – अझीम काझी.