
दुबई येथे होणार्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ३ मुंबईकर खेळाडूंचा पूर्ण खर्च उचलला
मुंबई ः जे बोलतो, ते करून दाखवतो असा लौकिक असलेले बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. येत्या १४ ते १८ जूनदरम्यान अजमन, दुबई येथे होत असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असलेल्या ३ मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंचा पूर्ण खर्च उचलत खानविलकरांनी आपले क्रीडा कर्तव्य बजावत खेळाडूंना नवी उर्जा दिली आहे.
अजय खानविलकर यांनी मुंबई श्री स्पर्धेदरम्यान तीन खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी शरीरसौष्ठवपटू हरमित सिंग, संदीप सावळे आणि महिला शरीरसौष्ठवपटू रेखा शिंदे या तिघांचा पूर्ण खर्च उचलला आहे. यात विमान प्रवास, भोजन-निवास व्यवस्था आणि स्पर्धेची नोंदणी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. खानविलकरांच्या दानशूरपणाचे क्रीडा जगतात चांगलेच कौतुक केले जात आहे. आशियाई स्पर्धेसाठी या तीन खेळाडूंसह ज्युनियर शरीरसौष्ठवपटू समर्थ कोचले आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटू मनोज बोचरेही सहभागी होणार आहेत.
शरीरसौष्ठव खेळाची परतफेड
खानविलकर यांनी मुंबईपाठोपाठ राज्य संघटनेची सुत्रे स्वीकारल्यानंतर शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यानूसार ते खेळाडूंच्या नोकरीसह त्यांना पुरस्कर्ते मिळवून देण्यालाही आपले कर्तव्य मानत आहेत. जे काही आयुष्यात कमावलेय ते फक्त आणि फक्त शरीरसौष्ठवामुळेच. त्यामुळे या खेळासाठी आम्ही काही करतोय, ते उपकार नसून आमचे क्रीडा कर्तव्य आहे. खेळाने आमच्यावर जी उधळण केली, त्याची ही आमच्याकडून परतफेड असल्याचे खानविलकर म्हणाले.
आशियाई स्पर्धेनिमित्त मुंबईच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपनगर संघटनेचे अध्यक्ष किटी फणसेका, सचिव राजेश सावंत, सुनील शेगडे, राकेश पांडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, विजय झगडे, राजेश निकम, अशोक शेलार, जयदीप पवार, गिरीश कोटियन, नरेंद्र कदम तसेच शरीरसौष्ठवातील दिग्गज प्रवीण सकपाळ, उमेश गुप्ता हे उपस्थित होते.