
सौरभ नवलेची नाबाद ७२ धावांची दमदार खेळी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सौरभ नवले (नाबाद ७२ धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर सातारा वॉरियर्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ७ धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयाबरोबरच सातारा वॉरियर्स संघाने आपली पराभवाची मालिका खंडित करुन विजयाचे खाते उघडले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातारा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये पवन शहा (४), हर्षल काटे (९) हे दोन आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर सातारा वॉरियर्स २ बाद ६४ धावा अशा स्थितीत होता. सलामीवीर ओम भोसले याने आक्रमक खेळी करत ३७ चेंडूत ५७ धावांची खेळी करून डाव सावरला. ओम याने ३ चौकार व ४ षटकार मारले. ओम भोसलेने सौरभ नवलेच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत ८० धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
कोल्हापूरच्या श्रेयस चव्हाणने ओम भोसले याला झेलबाद केले. त्यानंतर सौरभ नवले याने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची दमदार खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सौरभने ७ चौकार व ३ षटकार ठोकले. सौरभ नवले व शामसुझमा काझी (नाबाद २४) यांनी सातव्या विकेटसाठी २१ चेंडूत ४५ धावांची भागीदारी करून सातारा वॉरियर्स संघाला २० षटकात ६ बाद १७७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. कोल्हापूर संघाकडून अथर्व डाकवे (२-२९), दीपक डांगी (१-१९), श्रेयस चव्हाण (१-२४), रजनीश गुरबानी (१-३७) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघासमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान होते. पॉवरप्लेमध्ये ३९ धावा फटकावताना त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले. अंकित बावणे (११), राहुल त्रिपाठी (१०), सचिन धस (७) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. चौथ्या विकेटसाठी श्रीकांत मुंढे व सिद्धार्थ म्हात्रे यांनी ५० चेंडूत ७२ धावांची भागीदारी करून सामन्यावरील पकड कायम ठेवली. सिद्धार्थ म्हात्रे २८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर श्रीकांत मुंढेने ३३ चेंडूत अर्धशतक गाठले. श्रीकांत मुंढेने ४१ चेंडूत ६४ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ३ चौकार व ४ षटकार ठोकले. विजयासाठी १३ चेंडूत २६ धावा असे समीकरण असताना श्रीकांत मुंढे दुसरी धाव घेताना पवन शहाच्या थ्रोवर विवेक शेलार याने त्याला धावबाद केले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या आनंद ठेंगे याने सलग दोन चौकार मारून सामन्यातील रोमांच आणखी वाढवला. शेवटच्या षटकात ६ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना पहिल्या तीन चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर धनराज शिंदे(१२)जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नांत झेल बाद झाला व कोल्हापूर टस्कर्स संघाला २० षटकात ७ बाद १७० धावाच करता आल्या.
फिरकीपटू शुभम मेडने २६ धावांत सर्वाधिक बळी घेतले. त्याला विवेक शेलार (२-३१), वैभव दारकुंडे (१-२९) यांनी सुरेख गोलंदाजी करून साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
सातारा वॉरियर्स : २० षटकात ६ बाद १७७ धावा (सौरभ नवले नाबाद ७२, ओम भोसले ५७, शामसुझमा काझी नाबाद २४, अथर्व डाकवे २-२९, दीपक डांगी १-१९, श्रेयस चव्हाण १-२४, रजनीश गुरबानी १-३७) विजयी विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स : २० षटकात ७ बाद १७० धावा (श्रीकांत मुंढे ६४, सिद्धार्थ म्हात्रे २८, अंकित बावणे ११, राहुल त्रिपाठी १०, शुभम मेड ३-२६, विवेक शेलार २-३१, वैभव दारकुंडे १-२९). सामनावीर – सौरभ नवले.