
रोहन दामले नाबाद ८० धावांची उत्कृष्ट खेळी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रोहन दामले (नाबाद ८० धावा) याने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा ५ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. या विजयाबरोबरच ईगल नाशिक टायटन्स संघाने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाशिकच्या मनोज इंगळेच्या गोलंदाजीवर यश नाहरला १ धावावर असताना जीवदान मिळाले. पण याच षटकात पाचव्या चेंडूवर यश नाहरला (१) बाद करून पुणेरी बाप्पा संघाला पहिला धक्का दिला. मुर्तुझा ट्रंकवाला व ऋषिकेश सोनावणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ४० धावांची भागीदारी केली. ऋषिकेश सोनावणे १५ धावांवर बाद झाला. पाठोपाठ मुर्तुझा ट्रंकवाला २५ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा काढून तंबूत परतला. प्रशांत सोळंकी याने मुर्तुझा याला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार यश क्षीरसागरने २७ चेंडूत ३४ धावा करून संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. त्याने ३ षटकार खेचले. नाशिकच्या अक्षय वैकरने यशला झेलबाद करून पुणेरी बाप्पा संघाला चौथा धक्का दिला. अखेरच्या षटकात सुरज शिंदे २६, नौशाद शेख नाबाद २०, सचिन भोसले ११ यांनी धावा काढून संघाला २० षटकात ७ बाद १४९ धावसंख्या उभारून दिली. ईगल नाशिक टायटन्सकडून मुकेश चौधरी (२-२४), मनोज इंगळे (२-३६) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
याच्या उत्तरात ईगल नाशिक टायटन्स संघाने हे आव्हान १९.३ षटकात ५ बाद १५० धावा करून पूर्ण केले. मंदार भंडारी (०), अर्शिन कुलकर्णी (४), साहिल पारीख (१८) हे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे ईगल नाशिक टायटन्स संघ ३.५ षटकात ३ बाद २५ धावा अशा स्थितीत होता. रोहन दामलेने अथर्व काळेच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूत ३३ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. रोहन दामले ४९ धावांवर असताना निकित धुमाळने त्याला जीवदान दिले. रोहन दामलेने ३४ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. गतवर्षी पुणेरी बाप्पा संघाकडून खेळणाऱ्या रोहन दामलेने ४९ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याला रणजीत निकमने नाबाद २५ धावांची खेळी करून साथ दिली. रोहन व रणजीत निकम यांनी सहाव्या विकेटसाठी ४९चेंडूत ७१ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
४ एस पुणेरी बाप्पा : २० षटकात ७ बाद १४९ धावा (यश क्षीरसागर ३४, मुर्तुझा ट्रंकवाला ३३, सुरज शिंदे २६, नौशाद शेख नाबाद २०, ऋषिकेश सोनावणे १५, सचिन भोसले ११, मुकेश चौधरी २-२४, मनोज इंगळे २-३६, योगेश डोंगरे १-१२, प्रशांत सोळंकी १-२७) पराभूत विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स : १९.३ षटकात ५ बाद १५० धावा (रोहन दामले नाबाद ८०, रणजीत निकम नाबाद २५, साहिल पारीख १८, अथर्व काळे ११, रोहन खरात १-१५, सोहम जमाले १-१५, सचिन भोसले १-२५). सामनावीर – रोहन दामले.