पुणे वॉरियर्स महिला संघाचे वर्चस्व कायम

  • By admin
  • June 11, 2025
  • 0
  • 64 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाने सलग पाच विजयांसह अव्वल स्थान कायम राखत आपले वर्चस्व कायम राखले. इशिता खळे (१-१३) हिने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीसह श्वेता सावंत (३०धावा) व अक्षया जाधव (नाबाद २९) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे रत्नागिरी जेट्सचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकात ६ बाद ११२ धावा केल्या. गौतमी नाईक १५ धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर शिवाली शिंदेने अनुश्री स्वामी (१३) हिच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ४० धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे या सामन्यात शिवालीला तीन वेळा जीवदान मिळाले. ९ धावांवर असताना सुहानी कहांडळने तिला जीवदान दिले. त्यानंतर पुन्हा एकदा शिवाली २९ धावांवर असताना श्वेता सावंतने, तर ४० धावांवर असताना सुहानी कहांडळ हिने तिला जीवदान दिले.

शिवाली शिंदेने ४९ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी करत संघाला ११२ धावांचे आव्हान उभे करून दिले. तिने ३ चौकार व १ षटकार मारला. पुणे वॉरियर्सकडून इशिता खळे (१-१३), चिन्मयी बोरफळे (१-१०), खुशी मुल्ला (१-२७)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून रत्नागिरी वॉरियर्सला ११२ धावांवर रोखले.

११२ धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने १८.२ षटकात ४ बाद ११३ धावा पूर्ण केले. यात सुहानी कहांडळ (२१), खुशी मुल्ला (१८) यांनी ३२ धावांची सलामी दिली. त्यानंतर श्वेता सावंतने २९ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. श्वेता सावंत व अक्षया जाधव या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ५१ अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अक्षया जाधवने ३६ चेंडूत ४ चौकारांच्या साहाय्याने नाबाद २९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. रत्नागिरी जेट्सकडून भक्ती मिरजकर (२-७), प्रियांका घोडके (२-२०) यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक

रत्नागिरी जेट्स : २० षटकात ६ बाद ११२ (शिवाली शिंदे नाबाद ५८, गौतमी नाईक १५, ज्ञानेश्वरी पाटील १३, अनुश्री स्वामी १३, इशिता खळे १-१३, चिन्मयी बोरफळे १-१०, खुशी मुल्ला १-२७) पराभूत विरुद्ध पुणे वॉरियर्स : १८.२ षटकात ४ बाद ११३ (श्वेता सावंत ३०, अक्षया जाधव नाबाद २९, सुहानी कहांडळ २१, खुशी मुल्ला १८, भक्ती मिरजकर २-७, प्रियांका घोडके २-२०). सामनावीर – इशिता खळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *