
ब्राझील, इक्वेडोर, ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवेश निश्चित
नवी दिल्ली ः पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राझील, इक्वेडोर आणि ऑस्ट्रेलिया हे संघ पात्र ठरले आहेत. तिन्ही संघांनी आपाले सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी, लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला कोलंबिया संघाशी बरोबरी साधावी लागली. अर्जेंटिना संघ आधीच विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. याशिवाय, चिलीचा बोलिव्हियाकडून २-० असा पराभव झाला, त्यामुळे ते सलग तिसऱ्यांदा विश्वचषकातून बाहेर पडले आहेत.
फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी आतापर्यंत एकूण १३ संघ पात्र ठरले आहेत. २०२६ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकात ४८ संघ खेळतील. २०२२ च्या फिफा विश्वचषकापर्यंत, फक्त ३२ संघ मुख्य स्पर्धेत खेळत होते. २०२६ चा फिफा विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांच्या यजमानपदाखाली खेळला जाणार आहे. हे तिन्ही देश यजमान म्हणून आधीच पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा पुढील वर्षी जून आणि जुलैमध्ये खेळवली जाईल.
ऑस्ट्रेलिया फिफा विश्वचषकात खेळेल
कॉनर मेटकाफने ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल केला आणि सौदी अरेबियावर २-१ असा विजय मिळवून संघाला सलग सहाव्यांदा विश्वचषकात स्थान मिळवून दिले. मिचेल ड्यूकने दुसरा गोल केला. ऑस्ट्रेलियाला थेट विश्वचषकात प्रवेश करण्यासाठी पाच गोलच्या फरकाने पराभव टाळावा लागला. मेटकाफने हाफटाइमपूर्वी गोल केला, तर ड्यूकने ४८ व्या मिनिटाला हेडरने गोल केला. सौदी अरेबियासाठी अब्दुल रहमान अल ओबुदने १९ व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रेलियासाठी १०० वा सामना खेळणाऱ्या गोलकीपर मॅट रायनने शेवटच्या क्षणी पेनल्टीसह पाच गोल वाचवले. तत्पूर्वी, जपानने इंडोनेशियाचा ६-० असा पराभव करून सलग आठव्यांदा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.
दुसरीकडे, दक्षिण कोरियाने कुवेतचा ४-० असा पराभव करून सलग ११ व्यांदा विश्वचषकात प्रवेश केला. ओमानशी १-१ असा बरोबरी साधल्यानंतर पॅलेस्टाईन शर्यतीतून बाहेर पडला. आशिया आणि ऑस्ट्रेलियामधून जपान, इराण, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, जॉर्डन आणि ऑस्ट्रेलिया पात्र ठरले आहेत. आशियातून तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या सहा संघांपैकी आणखी दोन संघ पात्र ठरतील आणि ही फेरी ऑक्टोबरमध्ये खेळवली जाईल. हे संघ ओमान, कतार, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती आहेत.
ब्राझील आणि इक्वेडोर विश्वचषकासाठी पात्र
व्हिनिसियस ज्युनियरच्या गोलच्या बळावर, ब्राझीलने पॅराग्वेचा १-० असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल २०२६ साठी पात्रता मिळवली आणि ब्राझीलमध्ये पदार्पणात विजयाचा आनंद प्रशिक्षक कार्लो अँसेलोटीसाठी द्विगुणित झाला. रिअल माद्रिदचा स्टार व्हिनिसियसने सामन्यात एकमेव गोल केला. दुसरीकडे, कोलंबियाशी १-१ असा बरोबरी साधणाऱ्या गतविजेत्या अर्जेंटिनानेही पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या फुटबॉल मेगा-स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
ब्राझील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला, अर्जेंटिनापेक्षा दहा गुणांनी मागे. दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीत अजून दोन सामने बाकी आहेत. दक्षिण अमेरिकेतील अव्वल सहा संघांना ४८ संघांच्या विश्वचषकात स्थान मिळेल. ब्राझील सातव्या स्थानावर असलेल्या संघापेक्षा सहा गुणांपेक्षा जास्त पुढे आहे. उरुग्वेने व्हेनेझुएलाला २-० ने हरवले आणि आता त्यांचे २४ गुण आहेत आणि ते पात्रतेच्या अगदी जवळ आहे. व्हेनेझुएलाचे १८ आणि बोलिव्हियाचे १९ गुण आहेत आणि दोघेही सातव्या स्थानासाठी स्पर्धा करत आहेत, कारण त्या संघाला आंतरखंडीय प्लेऑफ खेळण्याची संधी मिळेल.
ब्युनोस आयर्स येथे झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला कोलंबियाने बरोबरीत रोखले. मेस्सीचा संघ आधीच पात्र ठरला आहे आणि तो गतविजेता देखील आहे. लुईस डियाझने २४ व्या मिनिटाला कोलंबियासाठी पहिला गोल केला. ज्युलियन अल्वारेझने ८१ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. ७० व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसला लाल कार्ड दाखवण्यात आले, ज्यामुळे स्टेडियममधील ८०,००० हून अधिक प्रेक्षकांची निराशा झाली.
फिफा विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले संघ
आशिया (एएफसी): जपान, इराण, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, उझबेकिस्तान.
ओशनिया (ओएफसी): न्यूझीलंड.
दक्षिण अमेरिका (कॉन्मेबोल): अर्जेंटिना, ब्राझील, इक्वेडोर.