
नवी दिल्ली ः भारताची वॉकर प्रियांका गोस्वामीने इन्सब्रुक येथे झालेल्या ऑस्ट्रियन रेसवॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १० किमी शर्यतीत प्रथम स्थान मिळवत हंगामातील तिचा पहिला विजय नोंदवला. गोस्वामीने ४७ मिनिटे आणि ५४ सेकंद वेळ नोंदवली. २० किमी रेसवॉकमध्ये तिचा एक तास २८.४५ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम आहे.
१० किमीमधील तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ४५ मिनिटे आणि ४७ सेकंद आहे, जी तिने २०२२ मध्ये केली होती. गोस्वामीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, “एक मिनिट पेनल्टी असूनही, मी सुवर्ण जिंकले जे सोपे नव्हते. ताप आणि पेनल्टीनंतर ते कठीण होते.” मे महिन्यात मेलबर्न येथे झालेल्या अॅथलेटिक्स व्हिक्टोरिया वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली. इन्सब्रुक येथे पुरुषांच्या ३५ किमी रेस वॉकमध्ये संदीप कुमार दुसऱ्या क्रमांकावर आणि राम बाबू तिसऱ्या क्रमांकावर राहिले.