
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक मोफत शालेय कॅरम स्पर्धेत शेठ जुगीलाल पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळे याने अजिंक्यपद पटकाविले.
निर्णायक बोर्डापर्यंत ६-६ अशा समान गुणांवर रंगलेल्या अंतिम सामन्यात प्रसन्न गोळे याने पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरला अखेर ११-६ असे चकविले आणि विजेतेपद हासील केले. सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखूनही सार्थक केरकरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
परेल येथील आरएमएमएस सभागृहात झालेल्या उपांत्य सामन्यात प्रसन्न गोळे याने कनोसिया हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरचा १९-६ असा तर सार्थक केरकरने डॉ अन्टोनियो दासिल्व्हा हायस्कूलच्या ध्रुव भालेरावचा १३-९ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. वेदिका पोमेंडकर व ध्रुव भालेराव यांनी उपांत्य उपविजेते तर ग्रीष्मा धामणकर, नील म्हात्रे, पुष्कर गोळे, ओमकार देसाई यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद जिंकले. माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी दिलीप वरेकर, पंच सचिन शिंदे व संतोष जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत अंतिम फेरीचा सामना सुरू झाला.