पुणे वॉरियर्स महिला संघाची अपराजित मालिका कायम

  • By admin
  • June 12, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

चिन्मयी बोरफळे, अनुजा पाटीलची प्रभावी गोलंदाजी 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चिन्मयी बोरफळे (३-२२)  हिने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह सुहानी कहांडळ नाबाद ४३ धावांच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवली.    

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर स्मॅशर्स संघाने पहिल्यांदा खेळताना २० षटकात ८ बाद १०५ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये ईश्वरी अवसरे (१०), तेजल हसबनीस (०) हे फलंदाज स्वस्तात गमावल्यामुळे सोलापूर स्मॅशर्स संघ ३ बाद २२ अशा बिकट स्थितीत होता. पण ईश्वरी सावकारने ४६ चेंडूत २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी करून संघाचा धावफलक हलता ठेवला. तिला दामिनी बनकर १७, शाल्मली क्षत्रिय १४ यांनी धावा काढून साथ दिली. पुणे वॉरियर्सकडून अनुजा पाटील (३-१५), चिन्मयी बोरफळे (३-२२) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून सोलापूर स्मॅशर्सला १०५ धावांवर रोखले.

या आव्हानाचा पाठलाग करताना खुशी मुल्ला (८), अक्षया जाधव (०), श्वेता सावंत (४) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे पुणे वॉरियर्स संघ ३ बाद १६ धावा अशा बिकट स्थितीत होता. सलामवीर सुहानी कहांडळ हिने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना ४३ चेंडूत ४९ धावांची संयमी खेळी केली. तिने ३ चौकार मारले. सुहानी व अनुजा पाटील (२२धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुहानीच्या साथीत श्वेता माने १०, उत्कर्षा कदम नाबाद १४ यांनी धावा काढून संघाला १८.३ षटकात ५ बाद १०८ धावा करून पूर्ण करून दिले. सोलापूर स्मॅशर्सच्या ईश्वरी सावकारने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक २४७ धावा करून ऑरेंज कॅपचा मान मिळवला.  

संक्षिप्त धावफलक
सोलापूर स्मॅशर्स : २० षटकात ८ बाद १०५ धावा (ईश्वरी सावकार ४४, दामिनी बनकर १७, शाल्मली क्षत्रिय १४, ईश्वरी अवसरे १०, अनुजा पाटील ३-१५, चिन्मयी बोरफळे ३-२२, इशिता खळे १-११, ख़ुशी मुल्ला १-१४) पराभूत विरुद्ध पुणे वॉरियर्स : १८.३ षटकात ५ बाद १०८ धावा (सुहानी कहांडळ नाबाद ४३, अनुजा पाटील २२, श्वेता माने १०, उत्कर्षा कदम नाबाद १४, मुक्ता मगरे २-१८, आरती केदार २-१७, ईश्वरी अवसरे १-१५). सामनावीर – चिन्मयी बोरफळे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *