
मुंबई ः येत्या १४ ते १८ जून दरम्यान बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे होणाऱ्या १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पूर्व विभागाच्या कबड्डी संघात घाटकोपर, भटवाडी येथील.सारा संदीप येवलेची निवड करण्यात आली आहे.
प्रशिक्षक अमित ताम्हाणेकर, संदीप येवले यांचे सारा येवलेला मार्गदर्शन मिळत आहे. गेली चार वर्षे सारा ही विविध कबड्डी स्पर्धांमध्ये खेळत असून कांजुर मार्ग पश्चिम येथील बलाढ्य स्वराज्य स्पोर्ट्स क्लबची ती खेळाडू आहे. पुणे विद्या भवन घाटकोपर येथील शाळेतून सारा नुकतीच दहावी परीक्षा ८९ टक्के गुण मिळवून पास झाली.
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा निवड चाचणी शिबिरातून साराची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. या अगोदर साराने तीन राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तिचे वडील चांगले कबड्डीपटू आहेत.
तिच्या या निवडीबद्दल सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या संचालिका दीपाली पवार, झूनझूनवाला कॉलेजचे उप-प्राचार्य यतिन राणे, पुणे विद्याभवन घाटकोपर शाळेचे मुख्याध्यापक पाटील, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश बारगजे, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, सरस्वती स्पोर्ट्स अकॅडमी,सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि वॉरियर तायक्वांदो अकॅडमी यांच्यावतीने साराचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.