
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीनगर ते किल्ले रायगड सायकल मोहिमेत १० सायकलवीरांनी सहभाग घेतला होता.
जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, पदाधिकारी अतुल जोशी, दीपक कुंकूलोळ यांनी फ्लॅग ऑफ करून सायकल राईडला सुरुवात केली. यावेळी पांडुरंग लहाने, सुधीर कुलकर्णी, अश्विनी लहाने, विजय पाटोडी, अनंत ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर-पुणे-मुळशी ताम्हिणी घाट मार्गे ३८० किलोमीटर अंतर पूर्ण करून सर्व सायकलवीर रायगड पायथ्याशी पोहोचले. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस मानवंदना देऊन जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेऊन नेत्रदीपक अशा राज्याभिषेक सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवत असताना युवराज संभाजीराजे छत्रपती यांची सायकलवीरांनी भेट घेतली. युवराज संभाजीराजे यांनी आस्थेवाईकपणे सायकलवीरांची माहिती घेऊन विचारपूस करून सर्व सायकलवीरांना शुभेच्छा दिल्या.
सायकल राईड मध्ये हरिश्चंद्र मात्रे, शुभम इधाटे पाटील, दीपक इधाटे पाटील, सौरभ कर्डीले, विष्णू बैनाडे, आनंद टर्के पाटील, रोहिदास चोंधे पाटील, अनिल देशमुख, पोपटराव आळंजकर, संतोष बेडके यांचा सहभाग होता.