
अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग : प्रियांका घोडके सामनावीर
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत आठव्या दिवशी अखेरच्या औपचारिक साखळी फेरीच्या लढतीत किरण नवगिरे (३७ धावा व १-१६) हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा १७ धावांनी पराभव करून आपला मोहिमेचा शेवट गोड केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्सच्या भेदक माऱ्यापुढे रायगड रॉयल्सचा डाव गडगडला. त्यांचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १०६ धावांवर संपुष्टात आला. यात कर्णधार किरण नवगिरेने २० चेंडूत सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. तिने ४ चौकार व २ षटकार मारले.

किरणला प्रियांका घोडकेने झेलबाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आदिती गायकवाड २३, भाविका आहिरे १९, मिहिका दिंगणकर १० यांनी डावाला आकार दिला. रत्नागिरी जेट्सकडून फिरकीपटू प्रियांका घोडके यशस्वी गोलंदाज ठरली. तिने १० धावा ५ बळी घेतले. याबरोबरच प्रियांकाने या स्पर्धेत एकाच सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केले. याआधी चिन्मयी बोरफळे हिने रायगड रॉयल्स विरुद्ध ४ गडी टिपले होते. प्रियांकाला अनुश्री स्वामी (२-१०), भक्ती मिरजकर (२-१५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून साथ दिली.
हे आव्हान रत्नागिरी जेट्स महिला संघ पेलू शकला नाही. त्यांचा संघ २० षटकात ९ बाद ८९ धावा करू शकला. त्यात रसिका शिंदे २९, गौतमी नाईक २२ यांनी केलेल्या धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. रायगड रॉयल्स संघाकडून इशा पठारेने १४ धावात २ गडी, तर यशोदा घोगरे (१-१३), किरण नवगिरे (१-१६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.
पाच विकेट घेणारी प्रियांका घोडके ही सामन्याची मानकरी ठरली. डब्लूएमपीएल स्पर्धेचा अंतिम सामना १४ जून रोजी पुणे वॉरियर्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स यांच्यात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : १९.४ षटकात सर्वबाद १०६ धावा (किरण नवगिरे ३७, आदिती गायकवाड २३, भाविका आहिरे १९, मिहिका दिंगणकर १०, प्रियांका घोडके ५-१०, अनुश्री स्वामी २-१०, भक्ती मिरजकर २-१५) विजयी विरुद्ध रत्नागिरी जेट्स : २० षटकात ९ बाद ८९ धावा (रसिका शिंदे २९, गौतमी नाईक २२, इशा पठारे २-१४, यशोदा घोगरे १-१३, किरण नवगिरे १-१६). सामनावीर – प्रियांका घोडके.
शुक्रवारी होणारे सामने
सकाळी ९.३० वाजता – रायगड रॉयल्स विरुद्ध ४ एस पुणेरी बाप्पा
दुपारी २ वाजता – सातारा वॉरियर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स
सायंकाळी ७ वाजता – रत्नागिरी जेट्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स