
सिद्धेश वीरचे धमाकेदार नाबाद शतक
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सिद्धेश वीर (नाबाद १०४ धावा) याने केलेल्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाचा डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हर्ष संघवीला (०) नाशिकच्या मुकेश चौधरीने क्लीनबोल्ड केले. सिद्धेश वीर व हर्ष मोगवीरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ५८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हर्ष मोगवीरा बाद झाल्यावर सिद्धेश याने एकहाती सामना गाजविला.
सिद्धेशने अवघ्या ६२ चेंडूचा सामना करताना नाबाद १०४ धावांची शतकी खेळी साकारली. सिद्धेशने धडाकेबाज शतकी खेळी करत ९ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडला. एमपीएलमधील हे दुसरे शतक ठरले. त्यानंतर सिद्धेश वीरने ओंकार खाटपेच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ७३ धावांची खेळी करून संघाची धावगती वाढवली. ओंकार खाटपे ३० धावा काढून बाद झाला. सिद्धेशने अजय बोरूडेच्या साथीत सहाव्या विकेटसाठी २१ चेंडूत ५७ धावा करून संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. १८व्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूत अजय बोरुडेने आक्रमक खेळी करत सलग तीन षटकार मारले.

२१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मंदार भंडारी (०) खाते न उघडताच तंबूत परतला. मंदार भंडारी सलग दुसऱ्या सामन्यात क्लीन बोल्ड झाला. अर्शिन कुलकर्णीने २४ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांची खेळी केली. तर, साहिल पारीख २० चेंडूत ४७ धावांची वेगवान खेळी करून त्याला साथ दिली. या जोडीने ३० चेंडूत ५२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण अर्शिनला आक्रमक फटका मारताना रायगडच्या तनय संघवीने झेल बाद करून नाशिक संघाला दुसरा धक्का दिला.
त्यापाठोपाठ साहिल पारीख ४७ धावांवर तंबूत परतला. रोहन दामलेने २३ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावा काढून संघाची धावगती वाढवली. फिरकीपटू विकी ओस्तवाल याने रोहन दामलेला पायचीत बाद केले. यावेळी ईगल नाशिक टायटन्स संघ १३.४ षटकात ४बाद १३४ अशा स्थितीत होता. पाऊस सुरु झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स : २० षटकात ५ बाद २१६ धावा (सिद्धेश वीर नाबाद १०४, हर्ष मोगवीरा २२, ओंकार खाटपे ३०, अजय बोरुडे नाबाद २७, दिग्विजय पाटील १२, प्रशांत सोळंकी २-३७, मुकेश चौधरी २-४२, योगेश डोंगरे १-४३) विजयी विरुद्ध .ईगल नाशिक टायटन्स : १३.४ षटकात ४ बाद १३४ धावा (साहिल पारीख ४७, अर्शिन कुलकर्णी ३८, रोहन दामले ३४, अथर्व काळे नाबाद १४, रणजीत निकम नाबाद ०, तनय संघवी २-२२, विकी ओस्तवाल १-२२). सामनावीर – सिद्धेश वीर.