दक्षिण आफ्रिका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर 

  • By admin
  • June 13, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

एडन मारक्रम (नाबाद १०२), टेम्बा बावुमा (नाबाद ६५) यांची नाबाद १४३ धावांची भागीदारी निर्णायक

लंडन  : सलामीवीर एडन मारक्रम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांच्या शानदार नाबाद १४३ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. पहिल्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आयसीसीचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी केवळ ६९ धावांची आवश्यकता आहे. शनिवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिका संघ (५६ षटकात दोन बाद २१३) ऐतिहासिक विजय किती वेळेत नोंदवतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

लॉर्ड्स मैदानावर २०० प्लस धावसंख्येचा पाठलाग अलीकडच्या काळात कोणत्याही संघाला शक्य झाले नव्हते. त्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले. या मैदानावरील मागील रेकॉर्ड पाहता हे लक्ष्य दक्षिण आफ्रिका संघाला जड जाणार असाच अंदाज व्यक्त होत होता. रायन रिकेलटन अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यानंतर आफ्रिका संघासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. एडन मारक्रम आणि विआन मुल्डर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. परंतु, मुल्डरची चिवट खेळी २७ धावांवर संपुष्टात आली. स्टार्क याने त्याची विकेट घेत सामन्यातील दुसरा बळी मिळवला. 
दोन बाद ७० अशा स्थितीत कर्णधार टेम्बा बावुमा सलामीवीर एडन मारक्रमला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांचा अप्रतिम सामना करत ..धावांची भागीदारी केली. या भक्कम भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील भक्कम पकड सैल झाली. या भागीदारीने सामना ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटला. एडन मारक्रम याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मारक्रम याने डावाची सुरुवात करताना चौथ्या डावात तिसरे शतक साजरे केले आहे. तसेच लॉर्ड्स मैदानावर चौथ्या डावात शतक झळकावणारा मारक्रम हा सहावा विदेशी फलंदाज ठरला आहे. मारक्रम याने तिसऱ्या दिवसाचा खेळ गाजवला. त्याने १५९ चेंडूंचा  सामना करत नाबाद १०२ धावा काढल्या आहेत. त्याने ११ चौकार मारले. कर्णधार बावुमा याने सुरेख फलंदाजी करत १२१ चेंडूत नाबाद ६५ धावा काढल्या. त्याने पाच चौकार मारले. या दोघांनी जबरदस्त फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे डावपेच उधळून लावले. स्टार्क याने ५३ धावांत दोन बळी टिपले. 

ऑस्ट्रेलियाची २८१ धावांची आघाडी 

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर कोसळला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर कोसळला. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ७४ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावानंतर ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी २८१ धावांची झाली आणि दक्षिण आफ्रिकेला जेतेपद जिंकण्यासाठी २८२ धावांचे लक्ष्य आहे. मिशेल स्टार्कने १३६ चेंडूत पाच चौकारांसह ५८ धावा काढत नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी १० व्या विकेटसाठी ५९ धावांची उत्तम भागीदारी केली. या भागीदारीच्या आधारे दोघांनीही ५० वर्षे जुना विक्रम मोडला आहे.

स्टार्कने शानदार फलंदाजी केली आणि प्रथम अॅलेक्स कॅरीसह आठव्या विकेटसाठी ६१ धावा काढल्या, त्यानंतर नवव्या विकेटसाठी १४ धावा काढल्या आणि नंतर हेझलवुडसह शेवटच्या विकेटसाठी १३५ चेंडूत ५९ धावांची भागीदारी केली. हेझलवुड १७ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेनने २२, स्टीव्ह स्मिथने १३, उस्मान ख्वाजाने ६, ट्रॅव्हिस हेडने ९, ब्यू वेबस्टरने ९ आणि कर्णधार पॅट कमिन्सने ६ धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीनला खातेही उघडता आले नाही. याशिवाय अ‍ॅलेक्स कॅरीने ५० चेंडूत पाच चौकारांसह ४३ धावा केल्या. त्याच वेळी नाथन लायनला फक्त दोन धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाला चार, तर लुंगी एनगिडीला तीन बळी मिळाले. मार्को जॅन्सन, वियान मुल्डर आणि एडेन मार्करामला प्रत्येकी एक बळी मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *