
गोवा, महाराष्ट्र, महा मुंबई संघांचेही घवघवीत यश
नाशिक (विलास गायकवाड) ः नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षांखालील राष्ट्रीय लगोरी फाउंडर्स कप अजिंक्यपद स्पर्धेत बिहार व हरियाणा या संघांनी विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात तिसरे स्थान संपादन केले.
लगोरी स्पोर्ट क्लब महाराष्ट्र व नाशिक स्पोर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वर्षांखालील लगोरी स्पोर्ट चॅम्पियनशिप नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनिकेत तटकरे, अॅड मनोज कुमार शिंदे, किरण पाटील, हेमंत पायर, अभिषेक लाड, सुभाष शिर्के आणि पवन सिंग, रणधीर सिंग (बिहार), जयवीर डड्डी (हरियाणा), राजेश (कर्नाटक), खुशी सिंग (झारखंड), शुभदा सवाईकर मॅडम (अध्यक्ष, गोवा) आणि तनवेश (सचिव, गोवा) हे उपस्थित होते.
लगोरी स्पोर्ट क्लबचे संस्थापक अध्यक्ष तुषार जाधव यांनी लगोरी खेळाचे नियम व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण १८ संघांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये नव्याने सामील झालेले संघ कर्नाटक, उत्तराखंड हे संघ सहभागी झाले होते.
लगोरी खेळाचा अंतिम सामना गोवा विरुद्ध बिहार यांच्यात झाला. बिहार संघाने उत्कृष्ट खेळ करत विजयश्री मिळाला तसेच गोवा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले., तृतीय क्रमांक महा मुंबई व महाराष्ट्र संघाला मिळाला. मुलींचा अंतिम सामना हरियाणा विरुद्ध बिहार यांच्यात झाला. हरियाणा संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळवले. बिहार संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक झारखंड व गोवा यांनी मिळवला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लगोरी स्पोर्ट क्लबचे संस्थापक अध्यक्ष तुषार जाधव ,नाशिक संघटक विलास गायकवाड, राजेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
मुलांचा गट ः १. बिहार, २. गोवा, ३. महाराष्ट्र, ४. महा मुंबई.
मुलींचा गट ः १. हरियाणा, २. बिहार, ३. झारखंड, ४. गोवा.