
नाशिक ः १५ जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळा आणि नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मल्लखांब दिन साजरा करण्याच्या हेतूने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (१५ जून) सकाळी १० वाजता मल्लखांब हॉलमध्ये याची सुरवात होणार आहे. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पदक प्राप्त मल्लखांबपटू विविध प्रकारचे प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. याचबरोबर मुलींही आपले मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब यांचे विविध प्रकार सादर करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी यशवंत व्यायाम शाळेचे ज्येष्ठ सभासद नंदेश यंदे आणि यशवंत व्यायाम शाळा तथा नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी गेल्या वर्षांमध्ये विविध राज्य आणि राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.
क्रॅश मॅटची भेट
या जागतिक मल्लखांब दिनाचे औचित्य साधून त्रिंबकेश्वर येथील राजा शिवछत्रपती व्यायामशाळेच्या मल्लखांब केंद्राला यशवंत व्यायाम शाळा आणि जिल्हा मल्लखांब असोसिएशन यांच्या वतीने चाळीस हजार रुपये किंमतीची मॅट भेट देण्यात येणार आहे. त्रिंबकेश्वर येथे व्यायामशाळेतील माजी मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी मल्लखांब केंद्र सुरू केले आहे. तेथे ४०-५० मुले-मुली मल्लखांबाचा सराव करतात. त्यांना अवघड मल्लखांब प्रकारांसाठी क्रॅश मॅटची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन याची पूर्तता करण्याचा या दोन्हीही संस्थांचा प्रयत्न आहे.
हा उपक्रम उत्तम रितीने साजरा व्हावा यासाठी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाचे रमेश वझे, दत्तात्रय शिरसाठ, यशवंत जाधव, ऋषिकेश ठाकूर, पंकज कडलग, साक्षी गर्गे आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमामध्ये नाशिकच्या जास्तीत जास्त क्रीडाप्रमींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.