किशोर नावकर, सुरज सुलाने यांची किलीमांजारो शिखरावर यशस्वी चढाई 

  • By admin
  • June 14, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर छत्रपती संभाजीनगरच्या किशोर नावकर व सुरज सुलाने यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वाधिक उंचीचा फ्री स्टॅंडिंग शिखर माउंट किलीमांजारो सर केला.

या शिखराची उंची समुद्रसपाटी पासून १९,३४१ फूट आहे. हे शिखर किशोर नावकर व सुरज सुलाने यांनी १२ जून रोजी सकाळी ७.२० वाजता सर केले आहे. या मोहिमेसाठी किशोर नावकर व सुरज सुलाने ४ जून रोजी मुंबईहून टांझानियाकडे रवाना झाले होते. माउंट किलीमांजारो मोहिमेस ७ जून रोजी सुरुवात केली. उल्लेखनीय बाब म्हणजे जानेवारी महिन्यात मराठवाडा दुर्ग भरारी मोहीम अंतर्गत मराठवाड्यातील १९ गड किल्ल्यांची माती माउंट किलीमांजारो शिखराच्या चरणी अर्पण केली. 

त्याचबरोबर नशा मुक्त युवा पिढी व “गर्ल्स कॅन क्लाइंब एवरी माउंटन” हा संदेश देत किशोर नावकर व सुरज सुलाने यांनी हे शिखर सर करण्यासाठी लिमोशो हा खडतर मार्ग निवडला. चढाई करताना घोंगावणारे वारे, पाऊस, १० ते १५ सेल्सियस उणे तापमान, रक्त गोठवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वीपणे मात करीत नावकर व सुलाने यांनी माउंट किलीमांजारो शिखरावर तिरंगा फडकवला. या मोहीमेचे आयोजन व नियोजन ३६० एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी  केले असून इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड दिनेश वकील, सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे व संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी व इंडियन कॅडेट फोर्सचे सर्व सीनियर्स यांनी अभिनंदन केले.

३६० एक्सप्लोरर विषयी
३६० एक्सप्लोरर मार्फत ही मोहीम आयोजित केली असून ३६० एक्सप्लोरर हा ग्रुप जगभर साहसी मोहिमांचे आयोजन करत असतो. ३६० एक्सप्लोररच्या नावे गेल्या ८ वर्षात अनेक विश्वविक्रम आहेत. अतिशय अवघड व आव्हानात्मक मोहिमांचे योग्य नियोजन करण्यात हातखंडा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे ३६० एक्सप्लोररचे समन्वयक म्हणून दत्ता सरोदे, किशोर नावकर व सुरज सुलाने हे काम पाहतात. लवकरच किशोर नावकर व सुरज सुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील ट्रेकर्स एव्हरेस्ट बेसकॅम्पवर जाऊन विश्वविक्रम करणार आहेत. यासाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिमानास्पद यश 
टीम ३६० एक्सप्लोररच्या किशोर आणि सुरज यांनी  मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. किलीमांजारो सर करून एक आदर्श निर्माण केला. ३६० एक्सप्लोरर मार्फत छत्रपी संभाजीनगर येथील अनेकांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे अशी प्रतिक्रिया एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी व्यक्त केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *