
२७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकून चोकर्सचा डाग धुवून काढला
लंडन ः ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदा अंतिम फेरी गाठणाऱया दक्षिण आफ्रिका संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर पाच विकेट राखून विजय साकारत पहिल्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकला. अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने एक नवा इतिहास रचला आहे. तब्बल २७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकत त्यांनी चोकर्सचा डाग धुवून टाकला आहे. शतकवीर एडेन मार्कराम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करून २०२३-२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. अशाप्रकारे, दक्षिण आफ्रिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणारा तिसरा संघ बनला आहे. यापूर्वी न्यूझीलंड (२०२१) आणि ऑस्ट्रेलिया (२०२५) यांनी हे जेतेपद जिंकले होते.

पहिल्या डावात फक्त १३८ धावांवर गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य साध्य केले. दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयात सलामीवीर एडेन मार्करामने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने शानदार शतक झळकावले. मार्कराम याला कर्णधार टेम्बा बावुमाची पूर्ण साथ मिळाली. तथापि, ६६ धावा करून बावुमा पॅव्हेलियनमध्ये परतला पण तोपर्यंत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने गेला होता. मार्कराम व बावुमा या जोडीने १४७ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
कमिन्स याने बावुमाची झुंजार खेळी ६६ धावांवर संपुष्टात आणली. परंतु, तोपर्यंत आफ्रिका संघाचा ऐतिहासिक विजय जवळपास निश्चित झाला होता. बावुमा याने १३४ चेंडूत ६६ धावा काढल्या. त्याने केवळ पाच चौकार मारले. २१७ धावसंख्येवर बावुमा बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स याला ८ धावांवर स्टार्क याने क्लीनबोल्ड केले. विजयासाठी अवघ्या सहा धावांची गरज असताना शतकवीर एडेन मार्कराम बाद झाला. हेझलवूड याने त्याला १३६ धावांवर बाद केले. मार्कराम याने २०७ चेंडूंचा सामना करत १३६ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्यात त्याने १४ चौकार मारले. बेडिंगहॅम (नाबाद २१), काइल व्हेरेन (नाबाद ४) यांनी संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिका संघाने ८३.४ षटकात पाच बाद २८१ धावा फटकावत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. स्टार्क याने ६६ धावांत तीन विकेट घेतल्या.
२७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली
डब्ल्यूटीसीच्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकेचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. यासह, टेम्बा बावुमाच्या संघाने अखेर २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने यापूर्वी १९९८ मध्ये पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. ही दक्षिण आफ्रिकेची पहिली आयसीसी ट्रॉफी होती. त्यानंतर, आफ्रिकन संघाला दुसरे आयसीसी जेतेपद जिंकण्यासाठी २७ वर्षांचा बराच काळ लागला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोन आयसीसी जेतेपदांमधील हा सर्वात मोठा अंतर आहे. यापूर्वी ही कामगिरी वेस्ट इंडिजच्या नावावर होती. वेस्ट इंडिजने २५ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
लॉर्ड्सवर पाचव्यांदा २००+ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग
दक्षिण आफ्रिकेचा कसोटीतील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. २००८ मध्ये पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४१४ धावांचे लक्ष्य गाठले. त्याच वेळी, २००२ मध्ये डर्बनमध्ये या संघाविरुद्ध ३३५ धावांचे लक्ष्यही गाठले आहे. आता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील तिसरा यशस्वी धावांचा पाठलाग केला आहे. लॉर्ड्स मैदानावर हा संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. या मैदानावर कसोटीत २०० प्लस धावांचे लक्ष्य गाठण्याची ही पाचवी वेळ आहे.
२ आयसीसी जेतेपदांमधील सर्वात मोठे अंतर
- दक्षिण आफ्रिका – २७ वर्षे (सीटी १९९८ – वर्ल्ड कप २०२५)
- वेस्ट इंडिज – २५ वर्षे (एकदिवसीय विश्वचषक १९७९ – वर्ल्ड कप २००४)
- न्यूझीलंड – २१ वर्षे (सीटी २००० – वर्ल्ड कप २०२१)
- भारत – १९ वर्षे (एकदिवसीय विश्वचषक १९८३ – वर्ल्ड कप २००२)
- पाकिस्तान – १७ वर्षे (एकदिवसीय विश्वचषक १९९२ – टी२० विश्वचषक २००९)